ड्रीम गर्लने दिला गुंगारा
By admin | Published: October 11, 2014 10:56 PM2014-10-11T22:56:54+5:302014-10-11T22:56:54+5:30
‘ड्रीम गर्ल’ हेमामालिनी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ येणार असल्याने त्यांना बघण्याच्या विशेष आकर्षणापोटी तब्बल चार तास उन्हात ताटकळणाऱ्या मतदारांची प्रचंड निराशा झाली. शेवटी दुपारी १.३० वाजता
फ्लॉप शो : चार तास ताटकळले मतदार
दर्यापूर : ‘ड्रीम गर्ल’ हेमामालिनी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ येणार असल्याने त्यांना बघण्याच्या विशेष आकर्षणापोटी तब्बल चार तास उन्हात ताटकळणाऱ्या मतदारांची प्रचंड निराशा झाली. शेवटी दुपारी १.३० वाजता खा. हेमामालिनी येणार नसल्याचे मंचावरून जाहीर करताच मतदारांनी गोंगाट करीत ‘नो उल्लू बनाविंग’चा सूर काढून भाजप उमेदवाराचा निषेध केला.
प्रसिध्द अभिनेत्री हेमामालिनी या भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे ‘स्टारडम’ असल्याने त्यांच्या सभेसाठी सभास्थळी महिला, मुलांसह मतदारांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळपासूनच कडक उन्हात महिला व मुले हेमामालिनी यांची एक झलक पाहण्यासाठी तळ ठोकून होते. वेळोवेळी मतदारांना हेमामालिनी अमरावतीला आल्या आहेत. थोड्याच वेळात त्या अंजनगावात पोहोचतील, अशा भूलथापा देऊन रोखून ठेवण्यात आले. येथील सारडा महाविद्यालयात हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. सभेची अनुमती असल्याने बंदुकधारी पोलिसांचा सकाळी ८ वाजतापासूनच कडक बंदोबस्त होता. विशेष तुकडीचे जवानही तेथे तैनात करण्यात आले होते. हेमामालिनी यांचे हेलिकॉप्टर कुठून आणि कोठे येणार तसेच आतापर्यंत का आले नाही, याबाबत भाजपच्या निरीक्षकांना व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनादेखील माहिती नव्हती.