सपन प्रकल्पात पाणी असूनही सिंचन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:42 AM2018-05-18T01:42:00+5:302018-05-18T01:42:00+5:30
अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पावर (धरण) आपात्कालीन स्थितीत धरणाचे दरवाजे उघड-बंद करण्यासाठीचे आवश्यक जनरेटर बंद पडले आहे. प्रकल्पात पाणी असूनही मागील सात वर्षांपासून प्रकल्पावर सिंचन नाही, तर प्रकल्पावर सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे जवळपास ४६० कोटींचा हा प्रकल्प वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पावर (धरण) आपात्कालीन स्थितीत धरणाचे दरवाजे उघड-बंद करण्यासाठीचे आवश्यक जनरेटर बंद पडले आहे. प्रकल्पात पाणी असूनही मागील सात वर्षांपासून प्रकल्पावर सिंचन नाही, तर प्रकल्पावर सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे जवळपास ४६० कोटींचा हा प्रकल्प वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
अचलपूर तालुक्यातील वझ्झर गावाजवळ असलेल्या सपन धरणाची एकूण लांबी ९९५ मीटर असून, महत्तम उंची ५५.२७ मीटर आहे. प्रकल्पाची जलसाठवण क्षमता ३८.६० दलघमी असून, एकूण सिंचन क्षमता ६३८० हेक्टर आहे. धरणात २०१०-११ पासून पाणी अडविले जात आहे. मागील आठ वर्षांपासून धरणात पाणी आहे. पण, जून २०१८ पर्यंतदेखील प्रकल्पावर एक एकराचेही सिंचन झालेले नाही. सिंचनाकरिता आवश्यक वितरिका व लघु कालव्याची कामे मागील आठ वर्षांपासून प्रलंबित आहेत.
४६० कोटींच्या या प्रकल्पावर सुरक्षिततेच्या अनुषंगाने प्रकल्पस्थळी २४ तास तीन पाळीत सुरक्षारक्षक आवश्यक ठरतात. धरण सुरक्षेकरिता अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक आहे. याकरिता प्राथमिक खर्चाचा अंदाज घेऊन स्वतंत्र अंदाजपत्रक बनविण्याची गरज आहे. तथापि, धरणाच्या सुरक्षिततेकरिता प्रकल्पस्थळी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा कार्यरत नाही.
पाटबंधारे विभागाकडे कर्मचारी नाहीत, असे यावर सांगितले जात आहे. केवळ एका मजुराच्या, चौकीदाराच्या भरवशावर हे ४६० कोटींचे धरण सोडण्यात आले आहे.
५० एचपीचे जनरेटर
पावसाळ्यापूर्वी धरणाचे दरवाजे, दरवाज्यांना तेलपाणी आणि दरवाजे उघडतात की नाही, बंद होतात की नाही, याची तपासणी यांत्रिकी विभागाचे अभियंते, अधिकारी प्रकल्पस्थळी जाऊन स्वतंत्ररीत्या करतात. ५० एचपीचे ते जनरेटर असून वीज नसताना धरणाचे चारही दरवाजे या जनरेटरवर आॅपरेट होतात. हे जनरेटर अंडर रिपेअर असून, चार-पाच वर्षांपासून त्याचे मेंटेनन्स नाही.
प्रकल्प अधिकाऱ्यांचे निर्देश
सपन प्रकल्पावरही यांत्रिकी विभागाने नुकतीच दरवाज्यांची तपासणी केली. यात पर्यायी व्यवस्थेसाठी जनरेटर बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांची दुरुस्ती, ते सुरू करण्याच्या सूचना त्यांनी प्रकल्प अधिकाºयांना दिल्या आहेत.