मेळघाटात १९ गावांतील पिण्याचे पाणी दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:48 PM2018-10-17T21:48:17+5:302018-10-17T21:48:31+5:30
मेळघाटात कुपोषण, माता- बालमृत्यू हे सत्र कायम असताना आता एक दोन नव्हे तर चक्क १९ गावातील पिण्याचे पाणी दूषित असल्याचा धक्कादायक प्रकार सप्टेंबर महिन्यातील प्राप्त अहवालातून समोर आला आहे. त्यामुळे आदिवासी कुटुंबीयांना शुद्ध पाणी मिळत नसेल तर राज्याचे आरोग्यमंत्र्यांनी मेळघाटात कितीही दौरे केलेत तरी ते निरर्थक ठरणार, असेच चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटात कुपोषण, माता- बालमृत्यू हे सत्र कायम असताना आता एक दोन नव्हे तर चक्क १९ गावातील पिण्याचे पाणी दूषित असल्याचा धक्कादायक प्रकार सप्टेंबर महिन्यातील प्राप्त अहवालातून समोर आला आहे. त्यामुळे आदिवासी कुटुंबीयांना शुद्ध पाणी मिळत नसेल तर राज्याचे आरोग्यमंत्र्यांनी मेळघाटात कितीही दौरे केलेत तरी ते निरर्थक ठरणार, असेच चित्र आहे.
जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी गत आठवड्यात ग्रामीण भागाशी निगडित प्रश्न, समस्यांबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले आदी उपस्थित होते. दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांनी मेळघाटात सप्टेंबर महिन्यात पाणी नमुने अहवाल सादर करताना १९ गावांमधील पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती दिली. भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यास ही गावे ‘डेंजर झोन’मध्ये येतील, अशी भीती आरोग्य प्रशासनाने व्यक्त केली. जिल्हा परिषदेने सप्टेंबर महिन्यात मेळघाटातील धारणी तालुक्यातील २३०, तर चिखलदरा तालुक्यातील १८९ गावांतील पिण्याच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले होते. त्यानुसार शासकीय पाणी तपासणी प्रयोगशाळेने चिखलदरा तालुक्यात १४ आणि धारणीत ५ गावचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल दिला आहे.
दरवर्षी ग्रामीण भागात लाखो रूपये खर्चून पाणीपुरवठा योजना बळकट केली जाते. मात्र, सप्टेंबरमध्ये पिण्याच्या पाण्याची ही स्थिती असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. आदिवासीबहूल भागात पिण्याचे पाणी शुद्ध मिळत नसेल तर कुपोषण, बाल आणि मातामृत्यू कसे रोखणार, हा गंभीर प्रश्न आहे. सप्टेंबर महिन्यात मेळघाटात पिण्याच्या पाण्याची स्थिती आरोग्यासाठी धोकादायक असल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पाणी नमुने दूषित आल्याबाबतच्या गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत.
आदिवासींच्या
वाट्याला अन्याय का?
शासन आणि विविध यंत्रणामार्फत मेळघाटात विकास कामे, उपक्रम राबविण्यासाठी अनुदान, निधी खर्च केला जातो. पाणी पुरवठा योजनेवर तर निरंतरपणे निधीची उधळण होते. असे असताना मेळघाटातील आदिवासींना शुद्ध पाणी मिळत नाही, हे दुर्देव असल्याची टीका धारणी येथील प्रहारचे नेते रमेश तोटे यांनी केली आहे. पाणीपुरवठा योजनेवर झालेल्या खर्चाबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती तोटे ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आरोग्य विभागाकडून पिण्याचे पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाते. त्याअनुषंगाने मेळघाटातील ४१९ गावांतील पाणी नमुने तपासणी करण्यात आले. यात १९ गावातील पाणी दुषित असल्याबाबतचा अहवाल मिळाला आहे. संबंधित गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील.
- सुरेश असोले,
जिल्हा आरोग्य अधिकारी