ड्रोन कॅमेऱ्याने जंगलातील खोऱ्यांचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:00 AM2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:09+5:30
सेमाडोह ते रायपूर मार्गातील चिकलाम फाटा ते चिकलाम व्याघ्र संरक्षण कुटी यादरम्यान गस्तीच्या पहिल्या टप्यात रायपूर परिक्षेत्रात पाहणी केली गेली. चिकलाम ते कारागोलाई व्याघ्र संरक्षण कुटीदरम्यान गस्तीच्या दुसऱ्या टप्यात माखला व लगतच्या परिसरात आगीबाबत निरीक्षण केले गेले. या निरीक्षणात त्या खोऱ्यात कुठेही आग दिसून आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात तीन उपवनसंरक्षकांनी १ मे रोजी सामूहिक गस्त घातली. या आंतरविभागीय गस्तीदरम्यान ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने जंगलातील संपूर्ण खोऱ्यांची पाहणीही केली गेली.
बुद्ध पौर्णिमेला होऊ घातलेल्या वन्यप्राणी गणनेसाठी तयार करण्यात आलेल्या मचानी, जंगलातील पाणवठे, वन्यप्राण्यांसाठी टाकले गेलेले चाटण, लोटण आणि आगीबाबतचे निरीक्षणही सामूहिक गस्तीदरम्यान उपस्थित वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले.
मेळघाट वन्यजीव विभागातील घटांग परिक्षेत्रातील १४ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह-रायपूर वनक्षेत्रात गस्त करीत वनसंवर्धनासाठी आवश्यक बाबींची माहिती घेतली. सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक शिवाबाला एस., मेळघाट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, मेळघाट प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार, सहायक वनसंरक्षक इंद्रजित निकम व कमलेश पाटील यांच्यासह सेमाडोह, रायपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी या आंतरविभागीय सामूहिक गस्त मोहिमेत सहभागी झाले होते.
सेमाडोह ते रायपूर मार्गातील चिकलाम फाटा ते चिकलाम व्याघ्र संरक्षण कुटी यादरम्यान गस्तीच्या पहिल्या टप्यात रायपूर परिक्षेत्रात पाहणी केली गेली. चिकलाम ते कारागोलाई व्याघ्र संरक्षण कुटीदरम्यान गस्तीच्या दुसऱ्या टप्यात माखला व लगतच्या परिसरात आगीबाबत निरीक्षण केले गेले. या निरीक्षणात त्या खोऱ्यात कुठेही आग दिसून आली नाही.
दरवर्षी उन्हाळ्यात मेळघाटच्या जंगलाला आगी लागण्याच्या घटना घडतात. त्या कधी नैसर्गिक असतात, तर कधी जंगलात शिरणाऱ्या मनुष्याच्या चुकीने वा हेतुपुरस्सर आगी लागतात. त्यांच्या नियंत्रणाबाबत सजग राहण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. यादरम्यान कारागोलाईत उपस्थित कर्मचाऱ्यांनी ड्रोन कॅमेरा वापरू न संपूर्ण खोऱ्याची पाहणी केली. ड्रोन कॅमेरा चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला. गस्तीदरम्यान मास्क वापरले गेले. हात धुतले गेले. फिजिकल डिस्टन्सिंग पाळले गेले.
आंतरविभागीय सामूहिक गस्त १ मे रोजी पार पडली. वनगुन्हे रोखण्यासह वनवणव्याच्या हंगामात आंतर विभागीय समन्वय ठेवण्याकरिता हा उपक्रम उपयुक्त ठरला.
- डॉ. शिवाबाला एस.
उपवनसंरक्षक
सिपना वन्यजीव विभाग परतवाडा