दुष्काळस्थिती ७८ मंडळांत, अग्रीम देणार चारमध्येच; विमा कंपनीची मनमानी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: November 18, 2023 08:26 PM2023-11-18T20:26:20+5:302023-11-18T20:27:18+5:30
शासन, प्रशासनाच्या आदेशाला जुमानेना
अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांनी ४१ महसूल मंडळांतील बाधित सोयाबीनसाठी अधिसूचना काढलेली आहे. शासनाने ७८ मंडळांत दुष्काळस्थिती जाहीर करून आठ सवलती दिल्या आहे. तरिही बाधित पिकासाठी अग्रीम देण्यास पीक विमा कंपनीची टाळाटाळ सुरूच आहे.
कंपनीद्वारा फक्त अंजनगाव तालुक्यातील चार मंडळांत शुक्रवारी सोयाबीनसाठी विम्याचा अग्रीम मंजूर करण्यात आला. यामध्ये पावसाची सर्वाधिक तूट असलेला असलेला दर्यापूर तालुकादेखील डावलला असल्याचे वास्तव आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ४१ महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली असली तरी पीक विमा कंपनीद्वारा फक्त चार म्हणजेच अंजनगाव तालुक्यातील भंडारा, कोकर्डा, सातेगाव व विहीगाव महसूल मंडळातच पीक विम्याचा अग्रीम मंजूर केला आहे. या मंडळातील १०,२६६ शेतकऱ्यांना आठ कोटी ६५ लाख ८८ लाखांचा अग्रीम मिळणार आहे.