संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचा दुष्काळ, घोषणांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:32+5:302021-09-16T04:17:32+5:30
विदर्भाच्या कॅलिफोर्नियाची शोकांतिका, १९५७ पासून पूर्णवेळ कार्यान्वित राहण्याचे आव्हान वरूड : तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येथून ...
विदर्भाच्या कॅलिफोर्नियाची शोकांतिका, १९५७ पासून पूर्णवेळ कार्यान्वित राहण्याचे आव्हान
वरूड : तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येथून देशासह विदेशातसुद्धा संत्राफळांची विक्री केली जाते. एवढेच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यासह बांगलादेशी व्यापारीसुद्धा या परिसरात येतात. संत्री, मोसंबीकरिता प्रसिद्ध असलेल्या ‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’त ७५ वर्षांमध्ये एकही संत्रा प्रक्रिया केंद्र नसणे ही संत्रा उत्पादकांची शोकांतिका आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेली घोषणा तरी पूर्ण होते काय, याकडे संत्रा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
शेंदूरजनाघाट येथे अमरावती फ्रूट ग्रोअर इंडस्ट्रीयल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या नावाने संत्रा ज्यूस काढणारी फॅक्टरी १९५७ मध्ये स्थापन झाली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी २७ नोव्हेंबर १९६० रोजी त्याचे उद्घाटन केले होते. त्यांनीच ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ असे संबोधन केले होते. सहकारी तत्त्वावर सुरु असलेला संत्रा प्रकल्पातून देशाच्या कानाकोपऱ्यात बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, मुंबई, कानपूर, अमृतसर आदी शहरांमध्ये संत्रा ज्यूस पोहचविला.
प्रकल्पाला घरघर
१९५८ ते १९६३ दरम्यान सुरळीत चालविल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जावर सुरू केलेल्या प्रकल्पाला राजाश्रय मिळाला नसल्याने आर्थिक घरघर लागली आणि प्रकल्प बंद पडला. यानंतर मागणी होत राहिली, पण प्रकल्प मिळाला नाही.
--------------
सहकारी प्रकल्पही रसातळाला
१९९२ साली सोपेक नावाने सहकारी तत्त्वावर संत्रा प्रक्रिया प्रकल्प वरूडलगत रोशनखेडा येथे सुरू झाला. परंतु, कालौघात बंद पडला. यानंतर तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी नोगा हा शासकीय संत्रा प्रकल्प मंजूर करून मायवाडी एमआयडीसीमध्ये उभा केला. मोठ्या थाटात उद्घाटन पार पडले आणि प्रकल्पही तेवढ्याच दणक्यात बंद झाला.
-----------------
आश्वासन हवेत विरले
२०१४ मध्ये तत्कालीन आमदार अनिल बोेंडे यांनी राष्ट्रीय कृषी व संत्रा परिषद १ते ४ ऑक्टोबर २०१५ ला वरूड येथील बाजार समितीच्या प्रांगणात घेतली होती. याप्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरुड येथे संत्रा डिहायड्रेशन प्रकल्प, तर मोर्शीला संत्रा प्रक्रिया केंद्राची घोषणा डझनभर मंत्र्यांसमोर झाली होती. परंतु, हे आश्वासन हवेत विरले. ॉ
दरम्यान, घोषणा आणि आश्वासनांची खैरात वाटून संत्रा उत्पादकांना आशेवर ताटकळत ठेवण्याचा प्रयत्न राजकारणी करीत आहे. सर्व घोषणा गेल्या ७५ वर्षांपासून हवेतच विरत असल्याची चर्चा असून शेतकऱ्यांचा सरकार वर विश्वासच राहिलेला नाही.
--------------
कुठे आहेत सुगीचे दिवस
२४ डिसेंबर २०१७ मधे गव्हाणकुंड येथील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात ना. नितीन गडकरी यांनी नागपूर येथील मिहानमध्ये पाच हजार कोटींचा संत्रा प्रकल्प स्वामी रामदेव बाबा यांच्यावतीने उभारणार असल्याचे सांगितले गेले होते.
------------------
नांदेड व्हाया मोर्शी
२०१४ मध्ये कोका कोलाचा प्रकल्प वरूडला होण्याच्या घोषणा झाल्या. वरूडचा प्रकल्प मोर्शीत हिवरखेड (ठानाठुनी) येथे गेला. हा प्रकल्प मोर्शीतून नांदेडला पळविला गेला.
---------------
पुन्हा घोषणा
१० मार्च २०२१ च्या अर्थसंकल्पात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प साकारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. परंतु, नेमका कुठे आणि किती आर्थिक तरतूद राहणार, हे कोडेच आहे.