मागणीच्या तुलनेत ४० टक्केच दुष्काळी मदत
By admin | Published: January 12, 2015 10:42 PM2015-01-12T22:42:53+5:302015-01-12T22:42:53+5:30
अपुऱ्या पावसामुळे बाधित झालेल्या ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी मागणी असलेल्या ३०२ कोटी ५१ हजारापैकी १२५ कोटी ७९ लाखाची मदत सर्व तालुक्यात वितरीत करण्यात आलेली आहे.
अमरावती : अपुऱ्या पावसामुळे बाधित झालेल्या ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी मागणी असलेल्या ३०२ कोटी ५१ हजारापैकी १२५ कोटी ७९ लाखाची मदत सर्व तालुक्यात वितरीत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात वितरित करावयाच्या एकूण अनुदानाच्या तुलनेत केवळ ४० टक्केच हा निधी आहे. किती गावामधील किती शेतकऱ्यांना हा निधी वाटप करावा हा पेच निर्माण झाला आहे. उपलब्ध निधी वर्णाक्षरानुसार गावाची निवड करून वितरीत करण्यात येणार असल्याची महसूल विभागाने दिली.
खरीपाचा हंगाम सरासरीपेक्षा कमी पाऊस, निकृष्ठ सोयाबीन बियाणे, दुबार, तिबार पेरणी, दोन महिना उशीराने झालेली पेरणी, रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस न आल्यामुळे पीक उद्धवस्त झाले. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे १५ नोव्हेंबरला शासनाने घोषित केली, राज्य विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनात शासनाने ११ डिसेंबर २०१४ ला दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यासाठी ७ हजार कोटी रूपयांचे पॅकेज घोषित केले. शासनाच्या घोषणेच्या २७ दिवसानंतर शासन निर्णय जाहीर झाला. जिल्ह्यात ३०२ कोटी ५१ लाखाची मदत अपेक्षीत असताना ४० टक्के नुसार १२५ कोटी ७९ लाख रूपये जिल्ह्यास ८ जानेवारीला मिळाले व शुक्रवार ९ जानेवारीला जिल्ह्यातील १४ तहसील कार्यालयास हा निधी वर्ग करण्यात आला. या निधीचे वाटप कसे आणि कोणत्या गावामधील शेतकऱ्यांना हा पेच महसूल यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे. उपलब्ध निधी हा मदतीचा पहिला टप्पा असला तरी जिल्ह्यास १७६ कोटी २२ लाख रूपये दुष्काळी मदत मिळणे अद्याप बाकी आहे.