विनयभंगप्रकरणी डॉक्टर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:39 PM2018-11-24T22:39:30+5:302018-11-24T22:40:12+5:30

आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या महिला रुग्णाशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी शहरातील डॉ. सतीश डहाके (३०, रा. रुक्मिणीनगर) यांना अटक केली. शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यास विलंब लागल्याने राजापेठ पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा रोष उफाळून आल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता.

Drug detection case | विनयभंगप्रकरणी डॉक्टर अटकेत

विनयभंगप्रकरणी डॉक्टर अटकेत

Next
ठळक मुद्देमहिला रुग्णाशी अश्लील चाळे केल्याचा आरोप : राजापेठ पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या महिला रुग्णाशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी शहरातील डॉ. सतीश डहाके (३०, रा. रुक्मिणीनगर) यांना अटक केली. शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यास विलंब लागल्याने राजापेठ पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा रोष उफाळून आल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता.
शहरातील एक ३२ वर्षीय विवाहित महिला छातीचे दुखणे घेऊन गुरुवारी दुपारी रुक्मिणीनगरातील दुर्वांकुर हॉस्पिटलचे एमडी फिजिशियन डॉ. सतीश डहाके यांच्याकडे गेली. त्यावेळी तिच्यासोबत लहान मुलगा व नणंद होती. डॉ. डहाके यांनी रुग्ण महिलेस तपासणी कक्षात बोलाविले. त्यावेळी नणंदेला बाहेरच थांबण्यास सांगितले. तपासणी करताना डॉ. सतीश डहाके यांनी अश्लील चाळे केले आणि हा प्रकार पतीला सांगायचा नाही, अशी धमकी दिल्याचेही महिला रुग्णाने तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने या घटनेची माहिती पतीला दिली. त्यानंतर दोघेही प्रथम फ्रेजरपुरा पोलिसांत गेले. मात्र, घटनास्थळ राजापेठ हद्दीत असल्यामुळे दोघांनीही राजापेठ पोलीस ठाणे गाठले. या गंभीर घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी व डॉक्टरांच्या समर्थकांनी राजापेठ ठाण्यात एकच गर्दी केली.
डॉक्टराच्या समर्थकांनी प्रकरण निपटविण्याचे प्रयत्न केले. तक्रारकर्ता पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम होते. सायंकाळ ते रात्री १० पर्यंत महिला रुग्ण तक्रारीसाठी बसली होती. मात्र, गुन्हा दाखल होण्यास विलंब का लागत आहे, यावर तक्रारकर्ता पक्षाचा रोष उफाळून आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी रात्री १० नंतर ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. या प्रकरणात आरोपी डॉ. सतीश डहाकेविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ (अ) ३५४ व ५०६ अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
भीम आर्मीचाही पुढाकार
तक्रारकर्त्यांची बाजू मांडण्यासाठी भीम आर्मी राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचली होती. भीम आर्मीचे मनीष साठे, सुदाम बोरकर, बंटी रामटेके आदी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन पीडित महिलेची बाजू मांडून गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटून धरली होती.
डॉक्टरची रात्र इर्विन रुग्णालयात
तक्रार दाखल करण्यास महिला पोहोचल्यानंतर डॉ. सतीश डहाकेसुद्धा ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. मात्र, असला काही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तपासणीच्या वेळी महिला नर्स हजर असल्याचेही ते पोलिसांना सांगत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी डॉ. डहाके यांना अटक केली. डॉ. डहाकेंची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने शनिवारी डॉ. डहाके यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, न्यायालयाबाहेर पडताच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. पुढील तपास पीएसआय गोकुल ठाकूर करीत आहेत.

आजाराच्या तपासणीसाठी गेल्यावर डॉक्टरने अश्लील चाळे केल्याची तक्रार पीडित महिलेने नोंदविली. त्यानुसार गुन्हा नोंदवून डॉक्टरला अटक केली आहे. हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असून, नेमके काय घडले, याबाबत चौकशी सुरू आहे.
- किशोर सूर्यवंशी
पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे.

Web Title: Drug detection case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.