बडनेरा रेल्वेस्थानकावर दारूड्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:32 PM2017-09-18T22:32:09+5:302017-09-18T22:32:37+5:30
मागिल आठवड्यापासून एक मद्यपी रेल्वेस्थानक परिसरात धुमाकूळ घालीत असून महिला प्रवाशांची छेडही काढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : मागिल आठवड्यापासून एक मद्यपी रेल्वेस्थानक परिसरात धुमाकूळ घालीत असून महिला प्रवाशांची छेडही काढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मद्यप्राशन करून सदर इसम वाटेल तशी शिवीगाळ करीत असतोे. त्यामुळे येथील सुरक्षेबाबत बडनेरा रेल्वे पोलिसांचे काहीच कर्तव्य नाही काय, असा सवाल उपस्थित होत आहे. बडनेरा रेल्वेस्थानकावर अलिकडे मोठ्या संख्येने बाहेरून आलेल्या भटक्यांनी तळ ठोकल्याने एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
बडनेरा रेल्वे स्थानक हे ‘जंक्शन’ म्हणून ओळखले जाते. येथून दरदिवशी मोठ्या संख्यने प्रवासी ये-जा करतात. बडनेरा रेल्वे स्थानकाला स्वच्छतेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून उत्तम दर्जाचे रेल्वेस्थानक म्हणून मानांकन मिळाले आहे. अशा रेल्वे स्थानकाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, आठवडाभरापासून एक दारूडा अर्धनग्न अवस्थेत या रेल्वे स्थानक परिसरात फिरून राजरोसपणे शिवीगाळ करीत आहे. शिवाय महिला प्रवाशांनाही तो त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, तरीही रेल्वे पोलिसांना याबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
सदर मद्यपी सोमवार १८ सप्टेंबर रोजी दुपारी तिकिटघराजवळील एका भिंतीवर दगड फेकून पादचारी पुलावरून ये-जा करणाºया प्रवाशांना जोरजोरात शिवीगाळ करीत होता.यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी या दारूड्यावर तत्काळ कारवाई करावी व प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
बडनेरा स्थानकावर वाढली ‘मुसाफिरां’ची संख्या
बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात ‘हरियाल’ नामक राष्टÑीय पक्ष्याची शिकार झाल्याच्या घटनेनंतर यापरिसरातून ‘मुसाफिर’ पसार झाले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पुन्हा मुसाफिरांची गर्दी रेल्वे स्थानक परिसरात दिसून येऊ लागली आहे. रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांनी देखिल याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
‘त्या’ दारूड्यावर व्हावी कारवाई
मागील आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी मध्यंतरी या दारूड्याला धमकावून समज दिला होता. मात्र, त्यानंतरही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे आता रेल्वे पोलिसांनी या दारूड्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.