पुसला येथे वर्षानुवर्षे दारूचा महापूर : महिलांचा आवाज बुलंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:25 AM2019-08-17T01:25:21+5:302019-08-17T01:25:45+5:30
अनेक दिवसांपासून पुसला गावात अवैध दारूचा महापूर व वरली मटका जुगाराला उधाण आल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावातील महिलांनी दारूबंदी व अवैध धंदे बंद करण्याकरिता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅली काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसला (वरूड) : अनेक दिवसांपासून पुसला गावात अवैध दारूचा महापूर व वरली मटका जुगाराला उधाण आल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावातील महिलांनी दारूबंदी व अवैध धंदे बंद करण्याकरिता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅली काढली. यात शेकडो महिला व सामाजिक संघटना सहभागी झाल्या.
ग्रामपंचायत ते भवानी मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आल्यानंतर दारूबंदी, वरली-मटका कायमचा बंद करावा, असे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले. आंदोलनात सरपंच सारिका चिमोटे, पंचायत सामिती उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, उपसरपंच अतुल बगाडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष डोंगरे, पोलीस पाटील सारिका डोंगरे, इंद्रभूषण सोंडे, विजय श्रीराव, दक्षता कमिटी अध्यक्ष स्वप्निल मांडळे, स्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू वरूडकर, युवा मित्र परिवारचे अध्यक्ष सूरज धर्मे, एकता विकास मंचचे सिद्धार्थ डोंगरे, गुणवंत हेडाऊ, सुनील चिमोटे, त्रिशूल दिवाण, संदीप बागडे, संतोष बोरीवार, महिला बचत गट समन्वयक सुमन कोल्हे, ज्योती कुकडे, धनश्री अळसपुरे, पुष्पा लाड यांच्यासह पुसला येथील महिला-पुरुष सहभागी झाले.
पालकमंत्र्यांनी घ्यावी दखल
दारूबंदीसाठी गावातील महिला व सामाजिक संघटना एका छताखाली आल्या आहेत. ग्रामपंचायत, महिला बचत गट व सामाजिक संघटनांनी दारूमुक्त गावासाठी पुढाकार घेतला आहे. पोलीस प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी स्वत:च्या मतदारसंघातील गावाची, गावकऱ्यांच्या आंदोलनाची, दारूमुक्त गावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सहकार्य करावे, दखल घ्यावी, अशी अपेक्षा पुसला ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.