धानोरा गुरव येथील बेंबळा नदीवरील बंधारा कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:12 AM2021-04-27T04:12:30+5:302021-04-27T04:12:30+5:30
फोटो पी २५ धानोरा नांदगाव खंडेश्वर : एकीकडे पाणीटंचाई निवारणासाठी शासनाचा दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत असताना धानोरा गुरव ...
फोटो पी २५ धानोरा
नांदगाव खंडेश्वर : एकीकडे पाणीटंचाई निवारणासाठी शासनाचा दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत असताना धानोरा गुरव येथील बेंबळा नदीवरील बंधाऱ्याचे गेट न अडविल्याने बेंबळा नदीतील पाणी वाहून गेले. आज बंधाऱ्यात समोरील परिसर कोरडा ठणठणीत झालेला आहे.
लाखो रुपये खर्चून हा कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला. या बंधाऱ्यात जर नदीचे पाणी अडवले गेले असते तर आजूबाजूच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढली असती व गुरांनादेखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले असते, असे धानोरा गुरव येथील उपसरपंच प्रमोद कोहळे यांनी सांगितले. हा बंधारा बेंबळा नदीवर धानोरा गुरव ते वाढोणा रामनाथ रस्त्यावर नांदसावंगी फाट्याजवळ आहे. संबंधित विभागाने वेळीच या बंधाऱ्यांची दुरुस्ती करून गेट बंद केले असते तर आज त्या ठिकाणी जलसंचय झालेला आढळून आला असता. पण या बंधाऱ्याचे गेट बंद न केल्याने पावसाचे पाणी आले आणि नदीतून वाहून गेले. पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम शासन राबवीत असताना हा संबंधित विभागाचा कर्मदरिद्री पणाच नव्हे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.