वनक्षेत्रातील पाणवठ्यांवर करडी नजर, उन्हाळ्यात विषप्रयोगाची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 07:33 PM2018-03-05T19:33:22+5:302018-03-05T19:33:22+5:30
मार्च महिना सुरू होताच वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठे आटत असून, वन्यजिवांची तृष्णा भागविण्यासाठी वनविभागाला कृत्रिम पाणवठ्यांची मदत घ्यावी लागते. मात्र, या कृत्रिम पाणवठ्यांवर वाघांची शिकार होण्याची भीती वन्यजीव विभागाने व्यक्त केली आहे.
अमरावती : मार्च महिना सुरू होताच वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठे आटत असून, वन्यजिवांची तृष्णा भागविण्यासाठी वनविभागाला कृत्रिम पाणवठ्यांची मदत घ्यावी लागते. मात्र, या कृत्रिम पाणवठ्यांवर वाघांची शिकार होण्याची भीती वन्यजीव विभागाने व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने विदर्भात वनक्षेत्रातील पाणवठ्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिल्या आहेत.
वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ९ फेब्रुवारी २०१८ रोजी वनविभाग, वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठवून पाणवठ्यांवर वाघ, बिबट आदी वन्यजिवांचे विषप्रयोगाने शिकार करण्याची दाट शक्यता असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे हे शिका-याचे लक्ष असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. मार्च महिना सुरू होताच विदर्भात उन्हाची दाहकता वाढते. विशेषत: नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये पाणी आटत असल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करतात. नेमकी हीच बाब हेरून शिकारी वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये विष कालवून वन्यजिवांचे शिकार करतात. विदर्भात सहा व्याघ्र प्रकल्प, नऊ अभयारण्य आणि २० राखीव वनक्षेत्रांतील नैसर्गिक पाणवठ्यात पाणी आटत असल्याची बाब वन्यजीव विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाने कृत्रिम पाणवठे तयार करण्याची लगबग चालविली आहे. उन्हाळ्यात वाघ, बिबट आदी वन्यजीव ठरावीक कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी पिण्यास येत असल्याची शिकाºयांना प्रामुख्याने माहिती असते. उन्हाळ्यात सहजतेने पाणवठ्यांत विष कालवून वाघांची शिकार झाल्याच्या घटना यापूर्वी व्याघ्र प्रकल्पात घडल्या आहेत. परिणामी पाणवठ्यांमध्ये विष कालवून अथवा युरीया मिश्रित करून वन्यजिवांची शिकार करण्याची भीती वन्यजीव विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणवठ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना नागपूर येथील वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी वनविभाग, वन्यजीव विभागाच्या मुख्य वनसंरक्षकांना दिल्या आहेत.
अशी घ्यावी लागेल पाणवठ्याची काळजी
वनक्षेत्रात नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणवठ्याची पशुवैद्यकीय अधिकाºयांकडून दैनंदिन तपासणी करून घ्यावे लागेल. युरीया मिश्रित पदार्थ, विषप्रयोगाबाबत वनाधिकाºयांनी सजग असावे. पाणवठ्यांबाबत वनकर्मचाºयांना तांत्रिक ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. पाणवठ्यात युरीया मिश्रित असल्याची तपासणीसाठी पीएच पेपरचा वापर करावा. पाणवठ्याची दररोज देखरेख आणि पाणी तपासणी करावी. व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालकांनी आकस्मिक भेट देऊन पाणवठे तपासणी करावे अशा सूचना एपीसीसीएफ वन्यजीव यांनी दिल्या आहेत.