‘ड्राय झोन’मध्ये अडीच हजार अवैध बोअरने उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:47 PM2019-03-09T22:47:30+5:302019-03-09T22:49:07+5:30
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरा जात आहे. सिंचन प्रकल्पात केवळ ५ ते १० टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरील संत्राबागा वाचविण्यासाठी बेकायदा बोअर केले जात आहेत. अलीकडच्या वर्षभरात अनधिकृत बोअरची संख्या तब्बल अडीच हजारांवर पोहोचली आहे.
संजय खासबागे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरा जात आहे. सिंचन प्रकल्पात केवळ ५ ते १० टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरील संत्राबागा वाचविण्यासाठी बेकायदा बोअर केले जात आहेत. अलीकडच्या वर्षभरात अनधिकृत बोअरची संख्या तब्बल अडीच हजारांवर पोहोचली आहे.
अवैध बोअरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना, महसूल विभागाचे मौन दलालांच्या घुसखोरीला हितकारी ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमधून उमटली आहे. महसूल व पोलीस यंत्रणेशी असलेल्या आर्थिक संगनमतामुळे बोअरची संख्या वाढली असताना, अवैध पाणी उपशाने भूगर्भाची चाळण झाली आहे.
तालुक्यात नऊ सिंचन प्रकल्प असून, या प्रकल्पांत केवळ पाच ते दहा टक्के जलसाठा आहे, तर जुन्या बोअर कोरड्या पडल्या आहेत. केवळ संत्रा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी ४० ते ५० हजार रुपये ‘आॅन’ देऊन बोअर केले. बोअरला पाणी लागले म्हणून आनंद झाला; परंतु आठवड्यात बोअर कोरडे पडल्या. लाखो रुपयांचा चुराडा झाल्याने संत्रा जगवावा कसा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तालुक्यात अडीच हजारांपेक्षा अधिक नवीन, मात्र अवैध बोअर करण्यात आले. त्यातील केवळ २५ टक्के बोअरलाच पाणी लागले. ७५ टक्के बोअरचा खर्च पाण्यात गेला. संत्र्यासह गहू, चणा, मक्का, मिरची, पालेभाज्या आदी बागायती पिके तालुक्यात घेतली जातात. या पिकांना पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे संत्र्याला आवश्यक असलेल्या वेळेत पुरेसे पाणी मिळत नाही. तालुक्यातील भूजलपातळीत कमालीची घसरण होऊन बोअरचे पाणी ७०० ते ८०० फुटांवर गेले, तर विहिरींची पातळी ६० ते ८० फुटांवर गेली आहे. याच संधीचा फायदा घेऊन बोअर करून देणारे दलाल तालुक्यात सक्रिय झाले आहेत.
महसूल विभाग बनला धृतराष्ट्र
तालुक्यातील अनेक गावांतील बसथांब्यावर बोअर करून देणारे दलाल दिसून येतात. मात्र, महसूल विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यास प्रतिबोअर मलिदा पोहोचविला जात असल्याने त्यांनी या बेकायदा बोअरकडे दुर्लक्ष चालविले आहे. महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून बोअर होत असताना, केवळ पैशांच्या मोहापायी तालुक्यातील भूगर्भाची चाळण केली जात आहे.
‘ड्राय झोन’मध्ये बोअर होतातच कशा?
सन २०१३ पासून तालुका ड्राय झोन घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार, भूगर्भाची पातळी अधिक खोल गेल्याने बोअर खोदकामावर बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे येथील संत्राउत्पादक गरज म्हणून बोअर करीत असेल तरी महसूलने त्याकडे का कानाडोळा चालवलाय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.