ड्रायझोन, छे ! वरूड तर कोरोनाचे कंटेन्मेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:12 AM2021-05-10T04:12:44+5:302021-05-10T04:12:44+5:30
फोटो पी ०९ वरूड संजय खासबागे वरूड : संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असताना अन्य तालुक्यांच्या तुलनेत वरूड तालुक्यात ...
फोटो पी ०९ वरूड
संजय खासबागे
वरूड : संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असताना अन्य तालुक्यांच्या तुलनेत वरूड तालुक्यात दिवसाकाठी रेकाॅर्डब्रेक कोरोना रुग्ण निघत आहेत. तालुका व शहरात रोज नव्याने कंटेन्मेंट झोनची भर पडत आहे. त्यामुळे पाण्याअभावी ‘ड्रायझोन’चा शिक्का लागलेला वरूड तालुका आता ड्रायझोन नव्हे, तर कोरोना हॉटस्पॉट व वाढत्या कंटेन्मेंट झोनसाठी ओळखला जाऊ लागला आहे. कोरोना बाधितांच्या एकूण संख्येत अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत वरूड तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, तरीही देखील येथील जनता बिनधास्त आहे.
वरूड शहरात १ मे ते ८ मे या कालावधीत एकूण २६८ रुग्ण तर वरूड तालुक्यात एकूण १,०८७ रुग्णांची नोंद झाली आहे. शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आले. मात्र, तेथे कोरोना त्रिसूत्रीची पुरेसी अंमलबजावणी होत नसल्याने सारेच हतबल झाले आहेत. परिणामी यंत्रणाच ऑक्सिजनवर आली आहे. आता ९ मे पासून कोरोना प्रतिबंधासाठी कडक लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, वरूड मुख्याधिकारी रवींद्र पाटील, वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकर, एपीआय सुनील पाटील यांनी शहरात धडक कारवाई सुरू केली आहे.
शहरात येथे आहेत कंटेन्मेंट
महात्मा फुले चौक, सतीचौक, कडूचे गोठाण परिसर
ही गावे ठरली हॉटस्पॉट
जरुड, पुसला, शेंदुरजनाघाट, बेनोडा, लोणी, वाठोडा, सुरळी, टेंभुरखेडा
तालुक्यातील ही १३ गावे सील
शेंदुरजनाघाट, पुसला, टेंभूरखेडा, जरुड, वाठोडा, राजूराबाजार, बेनोडा, लोणी, आमनेर, सुरळी, कुरळी, ढगा, अमडापूर