एकाच मार्गावरील दुहेरी वाहतूक जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:35 PM2018-03-31T22:35:35+5:302018-03-31T22:35:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात सिमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे एकाच मार्गावर चालणारी वाहतूक जीवघेणी ठरत आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने दररोज कित्येक अपघात घडत आहेत. आणखी किती नागरिकरांना हातपाय मोडावे लागणार आहे, असा सवाल आता अमरावतीकर करू लागले आहे.
इर्विन चौक ते बाबा कार्नरपर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे नवनिर्मित जिल्हा स्टेडीयमसमोरील एकाच मार्गावर वाहनाची वर्दळ सुरू झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी एक व्यक्ती दुचाकीवर पाच वर्षीय चिमुकलीला घेऊन जिल्हा स्टेडीयममधून मुख्य मार्गावर आली असता अचानक पंचवटी उड्डाणपुलावरून भरधाव येणारी दुचाकी धडकली. या अपघातात वडील किरकोळ जखमी झाले, मात्र, त्या चिमुकलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वाहतूक पोलिसांसमक्षच हा अपघात घडला. पोलिसांनी तत्काळ दोन्ही दुचाकी रस्त्याच्या बाजूला केल्या आणि जखमीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. अपघात घडविणाऱ्या दुचाकीस्वाराला गाडगेनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अशाप्रकारचे दररोज अनेक अपघात एकतर्फी मार्गावरील दुहेरी वाहतुकीमुळे घडत असल्याचे दिसून येत आहे. बडनेरा मार्गावरील समर्थ हायस्कूल चौक ते नवाथे नगरापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या मार्गावरसुद्धा अनेक अपघात होत आहेत. काहींना अपंग, तर काहींचे डोके फुटले आहे. अशा अपघातातील जखमी तत्काळ खासगी रुग्णालय गाठून उपचार घेत आहेत. अपघात घडविणारे वाहनचालक रुग्णालयीन खर्च करण्याची तयारी दाखवीत असल्यामुळे या अपघाताच्या पोलीस तक्रारीसुद्धा होत नसल्याचे आढळून येत आहे. मात्र, आणखी किती दिवस अशाप्रकारच्या अपघातातून जीव टांगणीवर ठेवावा लागणार आहे. हीच चिंता नागरिकांना सतावत आहे. अशा वाहतुकीसंदर्भात वाहतूक नियोजन व नियंत्रित व्हावे, अशी अपेक्षा अमरावतीकर करीत आहे.
दुहेरी वाहतूक बंद करता येणार नाही. मात्र, वेगमर्यादेवर लक्ष देता येईल. या वाहतूक समस्येबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न करू.
- रणजित देसाई,
सहा. पोलीस आयुक्त,
वाहतूक शाखा