आधुनिक तंत्रज्ञानाअभावी संत्रा उत्पादकांची दैना!
By admin | Published: November 25, 2015 12:50 AM2015-11-25T00:50:45+5:302015-11-25T00:50:45+5:30
तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी आहे. २१ हजार हेक्टर क्षेत्रात संत्र्याची लागवड होते.
राजाश्रयाचा अभाव : कधी कोळशीने खाल्ले तर कधी पाणीटंचाईने केला घात
लोकमत विशेष
संजय खासबागे वरूड
तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी आहे. २१ हजार हेक्टर क्षेत्रात संत्र्याची लागवड होते. यापैकी १६ हजार हेक्टरमध्ये फळ देणारी संत्रा झाडे आहेत. परंतु आधुनिक तंत्रज्ञान पाहिजे तसे तालुक्यातील संत्रा उत्पादकांपर्यंत पोहोचले नसल्याने येथील संत्रा उत्पादकांची दैनावस्था झाली आहे.
सन १९८२ मध्ये कोळशी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला होता. इतकेच नव्हे तर शेकडो हेक्टर संत्रा बागांची राखरांगोळी झाली होती. नंतरच्या काळात पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवल्याने हजारो संत्रा बागांवर कुऱ्हाडी चालल्या. यामुळे विदर्भाचा हा कॅलिफोर्निया वाळंवट होण्याच्या मार्गावर होता. आजही तीच परिस्थिती आहे. तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने संत्रा उत्पादकांनी केलेले सर्व प्रयत्न फोल ठरल्याने संत्रा उत्पादक डबघाईस आले आहेत.
तालुक्यात सन १९४५ पासून संत्रा लागवडीला सुरुवात झाली. पूर्वी संत्र्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, परिसरात शेतकऱ्यांना उद्योग मिळाला पाहिजे. म्हणून स्वबळावरच १९५७ मध्ये सहकारी तत्त्वावर शेंदूरजनाघाट मध्ये ज्यूस फॅक्टरी अमरावती जिल्हा फळ बागाईतदार रस उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, शेंदूरजनाघाट नावाने उभी राहून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर १९६० रोजी इमारतीची कोनशिला रोवण्यात आली. त्या काळात देशाच्या मुख्य शहरात संत्रा ज्युस पाठविण्याचा प्रयत्न झाला. परंतु राजाश्रय मिळाला नसल्याने पाच वर्षांत फॅक्टरी कर्जबाजारी होऊन मध्यवर्ती बँकेला जागा विकावी लागली.
नंतर वरुडमध्ये ‘सोपॅक’ ही खासगी संत्रा प्रक्रिया करणारी फॅक्टरी १९९२ मध्ये उभी राहिली. तीही बंद पडली आणि मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे शासनाचा ‘नोगा’ शासकीय संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला. तोही सुरु होताच बंद पडला. शासनाने यात खऱ्या अर्थाने रस घेऊन संत्र्यावर प्रक्रिया करुन विविध उत्पादने निर्माण करणारा प्रकल्प उभारल्यास संत्र्याला पुन्हा सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र, याकरिता संत्र्याला राजाश्रय मिळणे गरजेचे आहे.
बहुगुणी संत्र्याला कधी येणार ‘अच्छे दिन ?
राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे येथे ज्युस फॅक्टरी सोडाच. पण, वायनरी देखील सुरू होऊ शकली नाही. व्यापारी उच्च दर्जाची संत्री घेऊन जातात आणि दुय्यम दर्जाची संत्री फेकून दिली जातात. परंतु बहुगुणी संत्र्यावर संशोधन करून उत्पादने सुरू केल्यास संत्र्याला चांगले दिवस येऊ शकतात. परंतु याकडे कोण लक्ष देणार, हा प्रश्न आहे.
यशवंतराव चव्हाणांनी संबोधले होते ‘कॅलिफोर्निया’
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण वरूड भागात महात्मा फुले महाविद्यालयाच्या भूमिपूजनाकरिता आले असता येथील संत्रा तसेच कृषीवैभव पाहून वरूडला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ असे संबांधले होते. तेव्हापासून तालुका या नावाने प्रसिध्द झाला. मात्र, आज येथील संत्रा उत्पादकांची दुर्दशा झाली आहे. पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान,केरळ, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड,आंध्रप्रदेशासह आदी प्रांतातील व्यापारी व्यवसायासाठी वरुड तालुक्यात येत होते. हा व्यवसाय देशपातळीवर प्रसिध्द होता. शेंदूरजनाघाटच्या शेतकऱ्यांची संत्रा, लिंबू, मोसंबीच्या कलमांची शास्त्रोक्त पारंपरिक पध्दतीने निर्मिती करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असतानासुध्दा शासनाकडून तंत्रज्ञानाची जोड मिळाली नाही. या भागातून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय देशातील अनेकांना दिला. तरीही शासनाच्या उदासीन धोरणामुळे संत्राबागा नेस्तनाबूत होत असल्याचे दिसते.
देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला संत्रा ज्युस
सन १९५७ मध्ये चार-दोन युवकांनी संत्राफळांवर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न केला. ‘अमरावती फ्रुट ग्रोअर इंडस्ट्रीयल को-आॅप सोसायटी लिमिटेड’ या नावाने संत्र्याचा ज्यूस काढणारी फॅक्टरी सन १९५७ मध्ये शेंदूरजनाघाट या छोटयाशा गावात उभी राहिली. संत्र्याचा रस बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, मुंबई, कानपूर, अमृतसर, नागपूर आदी शहरात पोहोचला. परंतु १९५८ ते १९६३ पर्यंत ही सोसायटी सुरळीत चालली. सहकारी तत्त्वावर सुरु असलेल्या या ज्यूस फॅक्टरीतून देशात ज्यूस पाठविण्याचे काम सुरु होते. अखेर १९६३ मध्ये अमरावती जिल्हा बँकेच्या कर्जावर सुरू असलेल्या या संस्थेला बँकेचे कर्ज परत द्यावे लागल्याने ती बंद पडली आहे.
सोपॅक, नोगाचेही वाजले बारा!
वरूडमध्ये सन १९९२ मध्ये रोशनखेडा फाट्यावर सहकारी तत्त्वावर सोपॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रोशनखेडा फाट्यावर उभी राहिली. संत्रा रसाच्या बाटल्या ‘सोपॅक’ नावाने बाजारात आल्या. परंतु हेवेदाव्यात ही कंपनी बंद पडली. तत्कालीन कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी वरूड आणि काटोलकरिता असलेला संत्रा प्रकल्प मोर्शी तालुक्यात मायवाडी औैद्योगिक वसाहतीत सन १९९५ मध्ये साकार केला. त्याचा मोठा गवगवा झाला. मात्र, प्रत्यक्षात तेथे संत्र्याला व्हॅक्सीनेशनच केले गेले.