वीटभट्ट्यांवरील राखेच्या धुळीने बडनेरा हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:09 PM2018-11-27T22:09:48+5:302018-11-27T22:10:35+5:30
विटा बनविण्यासाठी औष्णिक वीज केंद्रात वापरलेल्या कोळशाच्या राखेचा वापर वीटभट्टीधारकांकडून होत असल्याने बडनेराच्या आसमंतात तिची धूळ पसरली आहे. त्यापासून खोकला व डोळ्यांचे आजार वाढले आहेत. यावर नियंत्रण कुणाचेच नसल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत.
श्यामकांत सहस्त्रभोजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : विटा बनविण्यासाठी औष्णिक वीज केंद्रात वापरलेल्या कोळशाच्या राखेचा वापर वीटभट्टीधारकांकडून होत असल्याने बडनेराच्या आसमंतात तिची धूळ पसरली आहे. त्यापासून खोकला व डोळ्यांचे आजार वाढले आहेत. यावर नियंत्रण कुणाचेच नसल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत.
बडनेरा, अंजनगाव बारी, वडद परिसरात मोठ्या संख्येत वीटभट्ट्या आहेत. सध्या विटा तयार करण्याच्या कामाला वीटभट्टीधारक लागले आहेत. सोफिया प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात राख आहे. तेथून ट्रकने ही राख वीटभट्टीकडे आणली जाते. या वाहतूकदरम्यान रस्त्याने सांडत जाणाऱ्या राखेमुळे ट्रकच्या मागे असणाºया वाहनचालकांना धुळीचा मनस्ताप सहन करावा लागतो. बडनेऱ्यातील कोंडेश्वर तसेच अंजनगाव बारी, वडद मार्गावर ही स्थिती अनुभवास येत आहे. येथे सध्या राखेचे ढिगारे लागले आहेत. जिकडे पाहाल तिकडे राखच दिसून पडते. कोंडेश्वरकडे जाणाऱ्या भाविक भक्तांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अंजनगाव बारी मार्गावर बरीच महाविद्यालये आहेत. शेकडोंच्या संख्येत विद्यार्थी या मार्गाहून ये-जा करतात. अंजनगावकडे जाणाऱ्यांचीदेखील मोठी वर्दळ या मार्गावर आहे. धुळीमुळे मोठा मनस्ताप व त्यापासून शारीरिक त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत असले तरी याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत.
वीटभट्ट्या बनल्या त्रासदायक
हिवाळा सुरू झाल्याने वीटभट्टी रचण्याचे काम सुरू आहे. नव्या विटांसाठी फ्लाय अॅशचे ढीग भट्टीच्या परिसरात रचले जात आहेत. त्याच्या कणांमुळे दमेकरी तसेच धुळीची अॅलर्जी असणाºया नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात वीटभट्ट्यांतून निघणारे उष्ण झोत या मार्गाने जाणाºयांना भाजून काढतात. एकूणच बडनेºयातील मार्गालगतच्या वीटभट्ट्या सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अशा वीटभट्टीचालकांवर प्रशासनाने ठोस कारवाई करावी, असे बोलले जात आहे.