मधमाश्यांमुळे लागला जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोताचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 02:39 AM2019-04-24T02:39:12+5:302019-04-24T02:39:30+5:30
वन्यप्राण्यांना तहान भागवण्यास मिळणार मुबलक पाणी
- वैभव बाबरेकर
अमरावती : उन्हाळ्यात भकास झालेल्या वडाळी वनपरिक्षेत्रात पाण्याचे नैसर्गिक स्रोत शोधून काढण्यात विभागाला मधमाशांच्या अस्तित्वामुळे यश आले. यामुळे वन्यप्राण्यांना तहान भागवण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्यासह वनरक्षक सुरेंद्र डहाके व निलेश करवाळे हे जंगल परिसरात गस्ती घालत होते. तेव्हा या वन कर्मचाऱ्यांनी मधमाश्यांच्या वास्तव्यातून पाण्याचा नैसर्गिक स्रोत शोधून काढला आहे. हे कर्मचारी आपआपल्या वनक्षेत्रात गस्त घालत असताना, त्यांना एके ठिकाणी दगडांवर मधमाश्यांना असल्याचे आढळले. त्यांनी जवळ जाऊन निरीक्षण केले असता, तेथे त्यांना ओलावा आढळला. त्यामुळे त्यांनी तेथील जागा खोदून मोठा खड्डा केल्यानंतर तेथे स्वच्छ पाणी आढळले. त्यांनी याबाबत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्याच ठिकाणी नैसर्गिक पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली. आता वडाळी वनपरिक्षेत्रात पूर्वीचा एक नैसर्गिक पाणवठा आहे, त्यात आणखी दोन नैसर्गिक पानवठ्यांची भर पडली आहे.
मधमाशी अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक
मधमाशी नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. मधमाशांमार्फत उत्कृष्ट परागीकरण घडते. त्यामुळे फळे, पिकांच्या गुणवत्तेत अनेकपटींनी वाढ होते. परागीकरणामुळे वनस्पतींची संख्या वाढते आणि अनेक प्रकारच्या वनस्पतींचे वाण टिकून राहण्यास मदत होते.
अशाप्रकारे निसर्गात जैवविविधता राखण्यास मदत होते. जगंलातील पाण्याच्या स्थळाजवळ किंवा ओलाव्याच्या ठिकाणी ते आढळतात. उन्हाळ्यात ओलावा शोषून घेत मधमाशा तहान भागवित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.