होकाराची डेडलाईन संपुष्टात, घनकचरा व्यवस्थापनावर मळभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:00 AM2017-09-02T01:00:03+5:302017-09-02T01:00:23+5:30
बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीसाठी संबंधित कंपनीला देण्यात आलेली डेडलाईन संपुष्टात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीसाठी संबंधित कंपनीला देण्यात आलेली डेडलाईन संपुष्टात आली आहे. दोन दिवसांत प्रकल्प उभारणीसंदर्भात होकार आल्यास महापालिका करारनामा करणार होती. तथापि कंपनीने होकाराचे पत्र न दिल्याने पुन्हा प्रकल्प अधांतरी लटकला आहे.
१५.९८ कोटी रूपये किंमत असलेला प्रकल्प महापालिका, ‘कोअर प्रोजेक्ट’ पीपीपी तत्वावर साकारणार होते. मात्र, आधी राजकीय पेच आणि त्यानंतर निरी अहवालाच्या प्रतीक्षेत तब्बल दहा महिने उलटून गेले. नगरविकास विभागाने कुठलेही निर्देश न दिल्याने मनपाला प्रकल्पासाठी करारनामा करता आला नाही. कोअर प्रोजेक्ट ७.९९ कोटींमध्ये नेमके कुठले व्यवस्थापन करणार आहे. प्रकल्पाची उपयोगिता व प्रकल्पकर्त्यांवर कुठली बंधने टाकण्यात येतील, हे स्पष्ट झाले नाही. अन्य कंपनी याच प्रकल्पासाठी ४५ कोटींचा डीपीआर बनवित असताना महापालिका १५.९८ कोटी रूपये खर्चून नेमकी कुठली यंत्रे लावणार होती, हे सुद्धा उघड होऊ शकले नाही. त्यानंतर याप्रकल्पाची उपयोगिता व तांत्रिक योग्यतेचा चेंडू ‘निरी’कडे टोलविण्यात आला. मे च्या अखेरच्या आठवड्यात निरीचा अहवाल प्राप्त झाला. त्याअनुषंगाने मनपाने महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कुठलाही पत्रव्यवहार केला नाही. दरम्यान निविदेच्या अधिकृततेचा कालावधी संपुष्टात आल्याने कोअर प्रोजेक्टने याप्रकल्पातून माघार घेतली. निविदेतील वैधता कालावधी संपल्याने प्रकल्प उभारणीतून माघार घेत असल्याचे पत्र कोअर प्रोजेक्टने दिले. त्यानंतर प्रकल्पाची उपयुक्तता लक्षात घेऊन आयुक्तांनी सोमवार २८ आॅगस्टला कोअर प्रोजेक्टच्या प्रतिनिधीला प्रकल्प उभारणीबाबत साकडे घातले. दोन दिवसांत माघारीचे पत्र परत घेऊन काम करण्यास होकार दिल्यास लगेच करारनामा करु, असे आयुक्तांनी आश्वस्त केले. तथापि चार दिवस उलटूनही ‘कोअर प्रोजेक्ट’ने काम करण्यासंदर्भात कुठलेही पत्र दिले नाही. किंवा ‘टेलिफोनिक’ होकारही भरलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकल्प उभारणीवर मळभ दाटले आहे.
देशमुखांची भूमिका अनाकलनीय
निरीचा अहवाल ‘कोअर प्रोजेक्ट’बाबत सकारात्मक असल्याचा दावा पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी केला. निरीने जर ‘कोअर प्रोजेक्ट’ करवी प्रकल्प उभारणीला हिरवी झेंडी दिली होती तर देशमुखांनी तेव्हाच करारनामा करण्यासाठी पाऊल का उचलले नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोअर प्रोजेक्टने माघारीचे पत्र दिल्यानंतरच का विनवणी करण्यात आली. तत्पूर्वी जुलै आणि आॅगस्ट महिन्यात ‘पारदर्शक’ देशमुखांना कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा होती, हे अनाकलनीय आहे..