रस्त्यावर शिक्षिकेचा मृतदेह आढळल्याने खळबळ मृत्यू, पतीपासून घेणार होती घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 05:41 PM2017-11-08T17:41:05+5:302017-11-08T18:54:22+5:30
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : चांदूर रेल्वे येथील एका शिक्षिकेचा मृतदेह नांदगाव-चांदूर मार्गावर सकाळी ८ वाजता आढळून आला.
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : चांदूर रेल्वे येथील एका शिक्षिकेचा मृतदेह नांदगाव-चांदूर मार्गावर सकाळी ८ वाजता आढळून आला. मंगळवारी शाळेत गेल्यापासून शिक्षिका बेपत्ता होती. कविता कीर्तिराज इंगोले (४०) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. या घटनेमुळे नांदगाव आणि चांदूर रेल्वे तालुक्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कविता इंगोले या चांदूर रेल्वे येथील नगर परिषद शाळेत शिक्षिका होत्या, तर पती कीर्तिराज हे आमला विश्वेश्वर येथील शाळेत शिक्षक आहेत. १६ वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला. मुलगा, मुलीसह इंगोले कुटुंब चांदूर रेल्वे येथे वास्तव्यास होते. मात्र, पतीसोबत वाद झाल्याने एक महिन्यापासून त्या माहेरी नांदगाव खंडेश्वर येथे राहत होत्या. येथूनच त्यांचे शाळेत येणे-जाणे सुरू होते.
मंगळवारी सकाळी ९ वाजता कविता इंगोले या शाळेत गेल्या होत्या. मात्र त्या रात्री उशिरापर्यंत परतल्या नाही. त्यामुळे त्यांच्या भावाने व वडिलांनी शोधाशोध केली. बुधवारी सकाळी शहरापासून एक किमी अंतरावर चांदूर रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी तूर्तास गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश पालवे यांनी घटनास्थळी भेट दिली. नांदगावचे ठाणेदार मगन मेहते पुढील तपास करीत आहेत.
शाळेतून वेळेवर परत
कविता इंगोले या मंगळवारी शाळा आटोपून सायंकाळी ५ वाजता चांदूरहून नांदगावसाठी एसटीने निघाल्या होत्या, अशी माहिती त्यांच्या सहका-यांनी दिली. त्यांच्या मृत्यूमुळे चांदूर शहरातही चर्चेला उधाण आले आहे.
कविताजवळ होते बॅगभर पैसे
कविता इंगोले यांचा भाऊ गजानन कटकतलवारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ती घटस्फोट घेणार होती. घटस्फोटाचे प्रकरण हाताळणाºया चांदूर येथील महिला वकिलाकडे चौकशी केली असता, कविता आल्याचे सांगून शुल्क दिल्यानंतर तिच्याकडे बॅगभर पैसे होते, तुम्ही तिच्या मित्र-परिवारास विचारा, असे त्यांनी सांगितले. मी बाहेरगावी जाणार असल्याने तिला पैशाची विनंती केली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.
शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल. गुन्हे दाखल केले असून, तपासाला सुरुवात केली आहे. सध्या कोणताही अंदाज लावता येणार नाही.
- मगन मेहते,
ठाणेदार, नांदगाव खंडेश्वर