दुष्काळाची चाहूल, शेतकरी धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:24 AM2019-07-11T01:24:31+5:302019-07-11T01:28:39+5:30
यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही १३ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्धेअधिक पेरण्या रखडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही १३ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्धेअधिक पेरण्या रखडल्या आहेत. येत्या १७ तारखेपर्यंत पावसाची ही स्थिती कायम राहणार असल्याची हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या स्थितीने धास्तावला आहे.
उत्पादनखर्चाच्या तुलनेत एकाही शेतमालास हमीभाव मिळालेला नाही. खरीप कर्जासाठी बँका शेतकऱ्यांना माघारी पाठवित आहेत. कर्जही नाही अन् कर्जमाफीही नाही, या अवस्थेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना यंदाच्या हंगामात पावसाळ्याच्या ४० दिवसानंतरही पेरणीयोग्य पाऊस नसल्याने अल्प कालावधीतील मूग, उडीद आदी पिके बाद होणार आहेत. त्यामुळे पर्यायी पिके कोणती घ्यावी, यासाठीचे आपत्कालीन पीक नियोजन सांगण्यास कृषी विभाग अन् कृषी विद्यापीठ समोर आलेले नाहीत. राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातच कृषी विभाग गाफील असेल, तर शेतकऱ्यांनी अपेक्षा तरी कोणाकडून करावी, असा बळीराजाचा सवाल आहे.
यंदाच्या पावसाळ्यात १० जुलैपर्यंत पावसाची २३५ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५७ मिमी पाऊस झालेला आहे. ही टक्केवारी ६७ आहे. यामध्ये धारणी तालुका वगळता उर्वरित १३ तालुक्यांची सरासरी ही ५५ ते ७० टक्क्यांपर्यंतच आहे.
वार्षिक सरासरीच्या १९ टक्केच पावसाची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. या आठवड्यात वातावरण ढगाळलेले असताना पाऊस मात्र बेपत्ता आहे. त्यामुळे अर्धेअधिक क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. जमिनीत आर्द्रता नाही. भूजलात प्रचंड घट आहे. सिंचन विहिरींनी तळ गाठलेला आहे. ही स्थिती यंदाही दुष्काळाची चाहूल देणारी असल्याने सद्यस्थितीत बळीराजा धास्तावला आहे.
हवामानाची सद्यस्थिती
मान्सूनचा अक्ष सध्या उत्तर भारतात सरकल्यामुळे विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. पुढील १७ तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पावसाचे प्रमाण अपेक्षापेक्षा कमी राहील. सध्या हिंदी महासागर, अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतीही मोठी हवामान प्रणाली कार्यरत नसल्यामुळे विदर्भ व महाराष्ट्रातील पाऊस थंडावला आहे. ताबडतोब कमी दाबाचा पट्टा किंवा द्रोणीय स्थिती तयार होण्याची शक्यता नसल्याने हीच स्थिती पुढील पाच ते सहा दिवस कायम राहणार असल्यावे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.