मेळघाटातील नद्यांचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:23 AM2019-04-25T01:23:24+5:302019-04-25T01:25:21+5:30
तालुक्यात नदी-नाल्यांतील पाणीसाठा संपल्यानंतरसुद्धा नदीपात्रात खड्डे करून पाणी उपसण्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम भूजलपातळीवर होणार आहे. दरम्यान, जंगलातील कृत्रिम पाणवठेही कोरडे झाले आहेत.
श्यामकांत पाण्डेय ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यात नदी-नाल्यांतील पाणीसाठा संपल्यानंतरसुद्धा नदीपात्रात खड्डे करून पाणी उपसण्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम भूजलपातळीवर होणार आहे. दरम्यान, जंगलातील कृत्रिम पाणवठेही कोरडे झाले आहेत.
मेळघाटातील लहान-मोठे नदी-नाले मेळघाटातील सिंचनाचे सर्वात मोठे स्रोत म्हणून ओळखले जातात. तापी, गडगा, खंडू, खापरा या नद्यांसह इतर लहान-मोठे नालेसुद्धा पाण्याचे स्रोत म्हणून काम करीत आहेत. परंतु, तीन-चार वर्षांपासून मेळघाटातसुद्धा पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे मार्च महिन्यापासून नदी-नाले आटत चालले आहेत. नदीपात्रातील उरले सुरले पाणी सिंचनासाठी वापरून घेतल्यानंतर उन्हाळी मुगासारख्या पिकांसाठी आणखी पाण्याची आवश्यकता भासत असल्याने लोकांनी नदीपात्रात अक्षरश: विहीरसदृश्य खड्डे खोदून त्यात लागलेल्या पाण्यात मोटरपंप टाकून सिंचनाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. या प्रकारात प्रशासनाने पुढाकार घेत अंकुश लावलेला नाही, प्रबोधन केले नाही वा कुणी पुढे येऊन तक्रार केल्याचेही अद्याप निदर्शनास आलेले नाही.
सिंचनासाठी पर्याय ठरणार तापदायक
मेळघाटात शेती वगळता व्यवसाय नसल्याने सर्वांचे लक्ष भरघोस पीक काढून आर्थिक उत्पन्न वाढविण्याकडे असते. त्याकरिता उन्हाळी पीक घेण्याकडे कल वाढलेला आहे. विहीर आणि बोअरवेलचे पाणी दिवसेंदिवस खाली जात असल्यामुळे सिंचनाची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत जवळपासच्या नदी-नाल्यांतून पाणी उपसण्याचा प्रताप सुरू असल्यामुळे मे आणि जून महिन्यातील ताप सहन करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
निसर्गाने मेळघाटला भरभरून दिले. क्षुल्लक स्वार्थापोटी मानवाने पर्यावरणाचा सत्यानाश केला. अवैध सिंचनाविरुद्ध कारवाई होणे आवश्यक आहे.
- रामदास जयस्वाल, पर्यावरणप्रेमी, शिरपूर
शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, पर्यावरणाचे नुकसान समर्थनीय ठरू शकत नाही. संबंधित विभागाने उपशाकडे लक्ष द्यावे.
- तुलसीराम सोनकर,
शेतकरी, धारणी