यशोमतींच्या पाठपुराव्यामुळे उलगडले माधुरीच्या खुनाचे रहस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:17 AM2018-04-26T01:17:20+5:302018-04-26T01:17:20+5:30
दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यासंदर्भात आ. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळेच माधुरी पोचगे हिच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांनी तत्परता दाखवून मारेकऱ्यांचा शोध घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यासंदर्भात आ. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळेच माधुरी पोचगे हिच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांनी तत्परता दाखवून मारेकऱ्यांचा शोध घेतला.
यशोमती ठाकूर यांनी माधुरीच्या कुटुंबीयांसह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले. यावेळी चर्चेदरम्यान प्रकरण विधिमंडळात लावून धरु, असा गर्भीत इशारा पोलीस आयुक्तांना दिला होता. त्यामुळेच पोलिसांनी तपास कार्याला गती देत माधुरीची हत्या करणाºयांना गजाआड केले.
तिवसा तालुक्यातील रहिवासी माधुरी अमरावतीत शिक्षण घेत असताना अमित अकाशे याने प्रेमजाळ्यात अडकविले. तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गर्भवती झाली. त्यानंतर तिचे अपहरण करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणात पोलीस खात्यातील आकाशे बंधूंसह सहकारी आरोपींना गाडगेनगर पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. मृत तरुणीचे आई-वडील व गावकरी आ. यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघातील आहेत.
घटनास्थळी मिळाले अवशेष
अमरावती : माधुरी ही १० महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांना मिळाली. यासंदर्भात आगस्ट २०१७ ला यशोमती ठाकूर यांनी गाडगेनगरचे पोलीस निरीक्षकांना विचारणा केली. त्यानंतर मुलीच्या वडील व भावाने तक्रार नोंदविली. मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी दुर्लक्ष केले. ही बाब पोलीस आयुक्तांनीसुद्धा मान्य केली आहे. अखेर हवालदील झालेल्या मुलीच्या आई वडिलांनी पुन्हा यशोमती ठाकूर यांची भेट घेतली. १६ एप्रिल रोजी यशोमती ठाकूर यांनी मुलीच्या आईवडिलांना सोबत घेऊन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेतली. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पत्र दिले व तारांकित प्रश्न येत्या अधिवेशनात उचलणार असल्याचे सांगितले. यावर पोलीस आयुक्तांनी तत्काळ दखल घेत गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक व सायबर सेल यांना दालनात बोलवून हे प्रकरण लवकरच उजागर करायला लावले. त्यामुळे सदर तरुणीच्या खुनाचे रहस्य पोलिसांनी उलगडले. सदर कुटुंबीयांना न्याय मिळाला. माधुरी पोचगे हिचा मृतदेह अचलपूर तालुक्यातील एका शेतशिवारात असणाºया विहिरीत जाळण्यात आला. मंगळवारी गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुन्हा तपासणी केली असता, विहिरीत काही अवशेष मिळाले. ते माधुरीचेच आहे किंवा नाही, ही बाब डीएनए तपासणीनंतर उघड होईल, ते अवशेष डीएनए टेस्टसाठी पाठविले जाणार आहे.
चारही आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडी
माधुरी पोचगे हत्याकांडात गाडगेनगर पोलिसांनी अमित सोमेश्वर अकाशे, मोहित अकाशे (दोन्ही रा.सुलतानपुरा, अचलपूर), अनूप पुरुषोत्तम हिरुळकर (२५,रा.अचलपूर) व शेतमालक नितीन प्रल्हाद श्रीराव या चौघांना अटक केली. अमित, मोहित व अनूप या तिघांना न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. शेतमालक नितीन श्रीरावला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. या चारही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना २७ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.