शेंदूरजनाघाट परिसरात वादळी पावसाने रबी पिकांची दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:07+5:302021-03-22T04:12:07+5:30
शेंदूरजनाघाट : परिसरात शनिवारी कोसळलेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे रबी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. गहू, चणा, एरंडीसह मक्याचे ...
शेंदूरजनाघाट : परिसरात शनिवारी कोसळलेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे रबी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. गहू, चणा, एरंडीसह मक्याचे पीक कोलमडले. खरिपातील पिकांचे नुकसान, संत्र्याच्या कमी दरामुळे चिंतातुर असलेल्या शेतकऱ्यांपुढे अवकाळी पावसामुळे आलेल्या परिस्थितीने हतबलतेची स्थिती ओढवली आहे.
शेंदूरजनाघाट परिसरात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यातच शनिवारी दुपारी ३ वाजता वादळासह पाऊस आला. यामुळे गहू, चणा, एरंडी पिकांसह जनावरांच्या चाऱ्यासाठी नियोजन केलेल्या मका पिकाचे नुकसान झाले. विजांचा कडकडासह अवकाळी पावसाने शिवारातील मजुरांना अक्षरश: झोडपले, तर रात्री पुन्हा सात-आठ वाजता वादळासह विजेचा कडकडासह अवकाळी पावसाने झोडपले. यामुळे नुकताच मोहरलेला गावरान आंबा जमिनीवर आला.
वादळामुळे शेंदूरजनाघाट शिवाराताल संदीप गोरडे यांच्या शेतातील खोपडीचे टीन उडाले. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून गंजी लावलेला गहू ओला झाला. जनावरांकरिता मका हे चाऱ्याचे पीक वादळामुळे काही ठिकाणी जमीनदोस्त झाले. आधीच खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कपाशी, हातची गेली. आता हे दुहेरी संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.