रेशन तांदळाच्या अवैध विक्रीचा पदार्फाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 01:07 AM2019-07-06T01:07:04+5:302019-07-06T01:07:39+5:30
शासकीय स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध विक्रीचा गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री पदार्फाश केला. पोलिसांनी शासकीय पुरवठादार सैयद मुनोज्जर अली सैयद मुजफ्फर (४३, रा. निषाद कॉलनी) व रेशन दुकानदार रिक्की राजकुमार साहू (३१, चेतनदास बगीचा, मसानगंज) या दोघांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासकीय स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध विक्रीचा गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री पदार्फाश केला. पोलिसांनी शासकीय पुरवठादार सैयद मुनोज्जर अली सैयद मुजफ्फर (४३, रा. निषाद कॉलनी) व रेशन दुकानदार रिक्की राजकुमार साहू (३१, चेतनदास बगीचा, मसानगंज) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ७० पोत्यांतील १८ क्विंटल तांदूळ व ट्रक असा एकूण ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शासकीय धान्याचे पुरवठादार सैयद मुनोज्जर यांचे निषाद कॉलनीत गोदाम असून, तेथून शासकीय धान्याचा विविध ठिकाणी पुरवठा केला जातो. मध्यवर्ती कारागृह, आदिवासी आश्रमशाळा अशा विविध ठिकाणी हे शासकीय धान्य पोहचविले जाते. गाडगेनगर पोलिसांना गुरुवारी रात्री येथून शासकीय धान्याची अवैध विक्री होत असल्याची माहिती हाती लागली. त्यानुसार पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर, डीबी पथकाचे हवालदार शेखर गेडाम, सतीश देशमुख, भारत वानखडे, विशाल वाकपांजर, रोशन वºहाडे, प्रशांत वानखडे यांच्या पथकाने धान्य गोदामावर धाड टाकली. त्यावेळी तेथे एका ट्रकमधून तांदळाचा माल उतरविला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पोत्यातील धान्याची तपासणी केली असता, ते धान्य शासकीय असल्याचे आढळले. पोलिसांनी ट्रकसह मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३,७, ईसी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे. शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागणी पोलिसांनी केली होती.
जिल्हा पुरवठा विभागाला पत्र
तांदळाचा मुद्देमाल शासकीय आहे किंवा नाही, याची शहानिशा करण्यासाठी गाडगेनगर पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे कळविले. शुक्रवारी पुरवठा विभागातील त्यावर शिक्कामोर्तब केले.
पोते बदलविले
शासकीय धान्याच्या पोत्यातील तांदूळ कोणाला ओळखत येऊ नये, यासाठी रेशन दुकानादाराने प्लास्टिकच्या पोत्यात तांदूळ भरला आणि त्यानंतर या शासकीय धान्याचा पुरवठा केला. पोलिसांनी घटनास्थळाहून जप्त केलेल्या मुद्देमालावरून ही बाब स्पष्ट झाली.