अपु-या पावसामुळे उपशावर निर्बंध, स्त्रोतांच्या ५०० मीटर अंतरात विहीर खोदण्यास मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 02:37 PM2017-10-09T14:37:55+5:302017-10-09T14:39:20+5:30
यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठीचे नियोजन आखले जात आहे.
अमरावती : यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठीचे नियोजन आखले जात आहे. यासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाने संबंधित यंत्रणेला दिले आहेत. आतापासूनच तत्परतेने कार्यवाही सुरू करावी, यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाणीटंचाई निर्माण झालेली गावे, वाड्यांमध्ये तसेच नागरी क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार स्थानिक परिस्थिती व स्त्रोतांचा विचार करून प्रस्तावित व किमान खर्चाच्या उपाययोजनांविषयी कार्यवाही करण्याचे निर्देशित केले आहे. मुळात पाणीटंचाई निर्माण होऊच नये, यासाठी ग्रामस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण व शिवकालीन पाणी साठवण योजनांसह जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. संभाव्य टंचाईग्रस्त पाणलोट क्षेत्रनिहाय व गावनिहाय आराखड्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येऊन पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खाली गेलेल्या गावांची यादी तयार करण्याचे सूचित करण्यात आलेले आहे. या गावांमध्ये विविध योजनांचे स्त्रोत युद्धपातळीवर पूर्ण करून गावांना त्वरित लाभ देण्याविषयीचे निर्देश देण्यात आले आहे.
अनेक गावातील योजना ह्या प्रकल्पावर अवलंबून आहेत. तेथील साठा पिण्याच्या पाण्याकरिता राखीव ठेवून वापराचे नियोजन करण्यात येणार आहे. पाण्याचा अनिर्बंध उपसा व अपव्यय होणार नाही याची स्थानिक स्वराज्य संस्थांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा विभागाने दिले आहे. पाणी पुरवठ्यासाठी शक्यतोवर शासकीय टँकरचाच वापर करावा. खासगी टँकरचा करारनामा करताना टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविण्याबाबतची व त्या टँकरची देखभाल दुरुस्ती वाहतूकदारानेच करायची, अशी अट घालण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
एक किमी परिघातील उपश्यावर निर्बंध
सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून ५०० मीटर अंतरात पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कारणासाठी विहीर खोदण्यास मनाई, पिण्याच्या पाण्याच्या एक किमी परिघात असणा-या स्त्रोताच्या उपश्यावर निर्बंध, उपश्याचे पाणलोट क्षेत्र असेल त्या क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त विहीर खोदण्यात मनाई व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उद्भवावर प्रतिकूल परिणाम करणा-या विहिरींच्या उपशावर आता निर्बंध आणन्यात येणार आहे.