अंदाजपत्रकाअभावी विहिरींचे काम रखडले
By admin | Published: June 5, 2016 12:03 AM2016-06-05T00:03:42+5:302016-06-05T00:03:42+5:30
सतत तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे सुल्तानी संकट ओढवले आहे.
शेतकरी संकटात : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून क्रूर थट्टा
नांदगाव खंडेश्वर : सतत तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे सुल्तानी संकट ओढवले आहे. विहिरीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा परिषदेचा जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप अंदाजपत्रक सादर न केल्याने ८६ विहिरींची कामे रखडली आहेत. ३० जूनपर्यंत ही कामे पूर्णत्वास जाणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांचे विहिरीचे स्वप्न अधांतरी लटकले आहे.
नोव्हेंबर २०१५ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ज्या विहिरींची कामे झाली नाही अशा विहिरींचे धडक सिंचन योजनेत वर्गीकरण करण्यात आलेत त्या विहिरींचे अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पाटबंधारे विभागाकडे देण्यात आली. रोहयोमधून धडक सिंचनमध्ये वर्गीकरण करण्यात आलेल्या १३९ विहिरीपैकी ५३ विहिरींचे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाने सादर केले. परंतु उर्वरित ८६ विहिरींचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद जलसिंचन विभाग, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसीलदारांकडे सादर न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीच्या आशा धुसर झाल्या आहेत.
एकीकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बाबतीत सतर्क असताना दुसरीकडे मात्र जि.प. व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालवल्या जात असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
अधिकारी शेतकऱ्यांशी उद्धट वागतात
रखडलेल्या विहिरींबाबत जि. प. जलसिंचन विभागाचे उपअभियंता प्रदीप ढेरे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तुमचे काम माझ्याकडे नाही व माझे कुणीच वाकडे करू शकत नाही, अशी उद्धट वागणूक दिल्याचे सिलोडा येथील शेतकरी रवी डांगे व सुधीर सवटे यांनी सांगितले.
धडक सिंचनमध्ये ४५ शेतकऱ्यांचा समावेश
तालुक्यातील मोरगाव, मलकापूर, राजना, कोहळा जटेश्वर, नांदसावंगी, शिवणी (रसुलापूर), सार्सी, वाढोणा, कोदोरी, बोरगाव, चिखली, फुलआमला, चांदसुरा, अडगाव, सावनेर, जावरा, फुबगाव, वाघोडा, नांदगाव, सालोड, शेलू नटवा, पिंपळगाव, भगुरा, शिलोडा, पापळ, गावनेर, तळेगाव, सातरगाव, शिवरा, टाकळी गिलवा, दाभा, येणस, धानोरा, जळू, लोणी, मोखड, माहुली चोर, वाटपूर, खंडाळा, हरणी, वडूरा, पुसनेर, शहापूर इत्यादी गावातील शेतकऱ्यांचा धडक सिंचनाच्या विहीर योजनेत समावेश असून ४५ गावांतील शेतकऱ्यांना विहिरीचे काम होण्याची आशा लागली आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या वक्रदृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, ही शंकाच आहे.