समन्वयाअभावी रखडला विकास

By admin | Published: February 14, 2016 12:24 AM2016-02-14T00:24:51+5:302016-02-14T00:24:51+5:30

कित्येक वर्षांपासून शहर विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या नांदगाववासीयांसाठी सन २०१२ मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. प्रत्यक्षात नांदगाव वासीयांची स्वप्ने साकार होणार, असे दिसू लागले.

Due to lack of coordination development | समन्वयाअभावी रखडला विकास

समन्वयाअभावी रखडला विकास

Next

नांदगाव खंडेश्वर : विकास कामांचा निधी गेला कुठे ?
मनोज मानवतकर नांदगाव खंडेश्वर
कित्येक वर्षांपासून शहर विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या नांदगाववासीयांसाठी सन २०१२ मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. प्रत्यक्षात नांदगाव वासीयांची स्वप्ने साकार होणार, असे दिसू लागले. परंतु विकासकामांचा धडाका सुरू होऊन काही कालावधीतच त्या विकासकामांना भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले. शहर विकासासाठी मंजूर झालेल्या निधीतून दोषपूर्ण कामे होत असताना मात्र नगरपंचायतीचे सत्ताधारी व विरोधक यांच्या समन्वयातील अभावाने विकासकामाची ऐशीतैशी झाली आहे.
नांदगाव शहरासाठी तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा अंतर्गत तीर्थक्षेत्र आराखड्यातील विविध विकासकामांसाठी १२ कोटी २५ लाख रुपये मंजूर झालेत. तसेच नांदगाववासीयांना कायमस्वरुपी पाणीपुरवठा होण्यासाठी ९ कोटी रुपयांची पाईपलाईन योजनासुद्धा टाकण्यात आली. परंतु ही कोट्यवधींची कामे गुणवत्तापूर्वक होत नसल्याने नांदगाववासीयांना फार मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा अंतर्गत कामकाजात प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्ता (पालखी मार्ग) अग्रक्रमाणे होणे गरजेचे होते. परंतु संबंधित कंत्राटदाराने मुख्य पालखी मार्गावर कुठलेही सिमेंट काँक्रीटीकरण न करता दीड वर्षापासून मुख्य रस्ता खोदून ठेवला आहे व या रस्त्यावर मंजूर झालेले १ कोटी ५५ लाख रुपयांपैकी ९० लाख रुपयांची उचल झालेली आहे. तीर्थक्षेत्र विकास कामांतर्गत होणाऱ्या १२ कामांपैकी ५ कामांवर ३ कोटी ८० लाखांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. त्यापैकी भक्तनिवासासाठी ५० लाख, स्वच्छता गृहासाठी ३० लाख, संरक्षण भिंतीसाठी १ कोटी ४५ लाख, पालखी रस्ता चौपदरीकण व रुंदीकरण १ कोटी ५५ लाख अशा निधीचा समावेश होता. ही कामे करीत असताना अंदाज पत्रकानुसार न करता संबंधित ठेकेदाराने मनमानी केल्याचे आरोप आहे. नागरिकांची पर्वा न करता वैयक्तिक स्वार्थापोटी नांदगावातील रस्त्यांचा खेळखंडोबा चालवल्याने संबंधित कंत्राटदाराविरुद्ध स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी पालिकेकडे डझनभर तक्रारी सादर केल्या आहेत. सन २०१३ मध्ये कॉलनी परिसरात जी काँक्रीट रस्त्याची कामे झालीत ती दोनच वर्षांत उखडल्याने या कामातसुध्दा फार मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे. याविषयी कंत्राटदार हारुणसेठ लधाणी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी 'मी या विषयावर सध्या बोलू शकत नाही', असे सांगितले.

Web Title: Due to lack of coordination development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.