मार्डीकरांमुळेच ९.३० कोटींच्या निधीचे प्रकरण न्यायालयात
By admin | Published: September 28, 2016 12:15 AM2016-09-28T00:15:47+5:302016-09-28T00:15:47+5:30
आ.राणा यांनी आणलेला ९.३० कोटी रुपयांचा निधी अविनाश मार्डीकरांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याचा ...
युवा स्वाभिमानचा आरोप : महापालिकेवर धडक
अमरावती : आ.राणा यांनी आणलेला ९.३० कोटी रुपयांचा निधी अविनाश मार्डीकरांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याचा आरोप युवा स्वाभिमानने केला आहे. याशिवाय रस्त्यातील खड्डेही महापौर आणि मार्डीकरांचीच देण असल्याचा आरोप करत मंगळवारी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर धडक दिली.
युवा स्वाभिमानचे शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी दुपारी १२ च्या सुमारास महापालिकेच्या प्रवेशव्दारावर धडक दिली. त्यांनी महापौरांच्या दालनाकडे मोर्चा वळविला. मात्र महापौर उपस्थित नसल्याने खुर्चीवर निवेदन ठेवून कार्यकर्त्यांनी महापौरांची खुर्ची दालनाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ९.३० कोटींच्या निधीला मार्डीकरांनी आव्हान दिल्याने शहराचा विकास खुंटल्याचा मोर्चेकऱ्यांचा आरोप होता. यावेळी ज्योती सैरिसे, सुमती ढोके, विलास वाडेकर, अनूप अगत्तवाल, रौनक किटुकले, शैलेंद्र कस्तुरे सचिन भेंडे यांच्यासह युवा स्वाभिमानी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. महापौरांच्या दालनानंतर युवा स्वाभिमानी कार्यकर्ते स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या दालनाकडे पोहोचले. मात्र पोलिसांच्या पूर्वसूचनेमुळे तेथील कर्मचाऱ्यांनी आधीच त्यांचे दालन कुलूपबंद केले. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मार्डीकरांच्या नामफलकावरच संताप व्यक्त केला. महिला कार्यकर्त्यांनी नामफलकाला वहाणांचा प्रसाद दिला.