६७ वर्षांत १२ वेळा मान्सूनची हुलकावणी

By admin | Published: July 12, 2017 12:04 AM2017-07-12T00:04:48+5:302017-07-12T00:04:48+5:30

यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असली तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. जिल्ह्यात येऊन ठेपलेला मान्सून प्रतिकूल हवामानामुळे माघारला.

Due to monsoon 12 times in 67 years | ६७ वर्षांत १२ वेळा मान्सूनची हुलकावणी

६७ वर्षांत १२ वेळा मान्सूनची हुलकावणी

Next

पिकांवर परिणाम : तब्बल आठव्यांदा जून महिना राहिला कोरडा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असली तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. जिल्ह्यात येऊन ठेपलेला मान्सून प्रतिकूल हवामानामुळे माघारला. मागील वर्षीचा हंगाम वगळता त्यापूर्वीचे दोन्ही हंगाम मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे उद्धवस्त झाले आहेत. ६७ वर्षांचा आढावा घेतला असता मान्सूनच्या आगमनात वैविध्य आढळून येते. आतापर्यंत १२ वेळा मान्सूनचे नियोजित वेळेपेक्षा उशिरा आगमन झाले आहे. सन २००२ मध्ये २७ जुलैला मान्सून बरसला होता. ही मान्सूनची सर्वात उशिराची हजेरी मानली जाते. तब्बल आठव्यांदा जून महिना कोरडा राहिला, हे विशेष.
जिल्ह्यासह विदर्भात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. यापूर्वीच्या ६० वर्षांचा आढावा घेतला असता सन १९९० साली ५ जून रोजीच मान्सूनचे आगमन झाले होते. मान्सूनने यावर्षी सर्वात लवकर हजेरी लावलेली होती. यावर्षी जून महिन्यात मान्सून सर्वसामान्य राहिल व वर्षभरात सरासरी इतका पाऊस पडेल, असे भाकित हवामान विभागाने केले होते. प्रत्यक्षात जून महिन्यात जिल्ह्यात तुरळक पाऊस पडला.
जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ ४९ टक्के पाऊस पडला आहे. यंदा मृग आणि आर्द्रा नक्षत्र कोरडेच गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त पाच जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसूवर होती. मात्र असताना पुनर्वसू लागून आठवडा उलटल्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
यापूर्वी सन १९५१, १९५५, १९६५, १९७२, १९८७, २००९, २०१४ व २०१७ मध्ये जून महिना कोरडा गेला. आतापर्यंत ६७ वर्षांत आठव्यांदा जून महिना कोरडा गेला आहे. याचा थेट परिणाम खरीप पेरणीवर झाला. यंदा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. सद्यस्थितीत जिल्ह्यात फक्त ४६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपासाठी प्रस्तावित ७ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तीन लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत.

सन १९९० मध्ये लवकर,२००२ सर्वाधिक उशिरा
जिल्ह्यासह विदर्भात मागील ६७ वर्षांत मान्सूनच्या आगमनाचा आढावा घेतला असता ५ जून १९९० रोजी सर्वात लवकर तर २००२ मध्ये २७ जुलै रोजी झालेले मान्सुनचे आगमन हे सर्वाधिक उशिरा ठरले आहे. तब्बल ११ वर्षे मान्सूनचे जुलै महिन्यात आगमन झाले तर ४० वर्षांत ५ ते ३० जून या कालावधीत मान्सूनचे आगमन झाले आहे.
पीक, पेरणी, बियाण्यांचे नियोजन आवश्यक
पावसाळा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू झाल्यास सोयाबीनची पेरणी करता येते.सोयाबीन-तूर आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे. मूग व उडिदाची पेरणी शक्यतोवर टाळावी.
पेरणी करताना साधारणपणे २५ ते ३० टक्के बियाण्यांचा अधिक वापर करावा व रासायनिक खतांच्या वापरामध्ये २५ टक्के कपात करावी.२५ जुलै पर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते.
पावसाळा जुलैच्या चवथ्या आठवड्यात सुरू झाल्यास शक्यतोवर कपाशीची पेरणी करू नये. करावयाची असल्यास देशी कपाशीचे सुधारित वाण पेरावे. बियाणे २० ते ३० टक्के अधिक वापरावे. कपाशीच्या ओळींची संख्या कमी करून मधात एक किंवा दोन तुरीच्या ओळी घ्याव्यात.

Web Title: Due to monsoon 12 times in 67 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.