डांबरीकरणामुळे राजापेठ धूलिकणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:23 PM2017-12-02T23:23:30+5:302017-12-02T23:23:59+5:30
राजापेठ रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल बांधकामामुळे निर्माण झालेल्या धूलिकणांचा प्रकोप अमरावतीकरांच्या आरोग्यावर धातक परिणाम करणारा ठरत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : राजापेठ रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल बांधकामामुळे निर्माण झालेल्या धूलिकणांचा प्रकोप अमरावतीकरांच्या आरोग्यावर धातक परिणाम करणारा ठरत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने उपाययोजनेसाठी पाऊल उचलून रस्ते खड्डेमुक्त करण्यासोबतच डांबरीकरण केल्यामुळे राजापेठ परिसरात धूलिकणमुक्त झाला आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांसह या मार्गाने ये-जा करणाºया वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरातील वाढते धूलिकण अमरावतीकरांचे आयुष्यमान कमी करण्यास कारणीभूत ठरत होते. उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे पर्यायी मार्ग खड्डामय झाल्यामुळे वाहनांच्या वर्दळीमुळे धूलिकण हवेत उडत होते. या धूलिकणांमुळे श्वसन आजाराचे प्रमाण वाढल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतिक्रियांमधून उघड झाले. धूलिकणांचा वाढता प्रकोप अमरावतीकरांच्या आरोग्यावर घातक परिणाम करीत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने काही दिवसांपूर्वी 'उड्डाणपुलाची डोकेदुखी' या वृत्त मालिकेतून लोकदरबारी मांडले. त्याची दखल घेत स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे यांनी महापालिका सभागृहात मुद्दा मांडला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या निर्देशाप्रमाणे पर्यावरण विभागाने संयुक्त बैठक बोलावून धूलिकणावरील उपाययोजनेसंदर्भात 'अॅक्शन प्लॅन' तयार केला. त्यानुसार मागील १५ दिवसांपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच आता डांबरीकरणाच्या कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे. धूलिकणांचा सर्वाधिक प्रकोप असणाºया राजापेठ चौकातील दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आल्यामुळे आता नागरिकांना धूलिकणांपासून मुक्तता मिळाली आहे. आता शहरातील अन्य ठिकाणच्या रस्त्यांचेही दुरुस्ती कामे केली जाणार आहे.