प्रदूषणाच्या मुद्यावरून दोन खात्यांत जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:30 AM2018-02-20T00:30:40+5:302018-02-20T00:32:28+5:30
जेपी एन्टरप्रायझेस या सिमेंट रोडचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने शहरात पसरविलेल्या घातक प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे आणि कारवाई करणे ...
अमरावती : जेपी एन्टरप्रायझेस या सिमेंट रोडचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने शहरात पसरविलेल्या घातक प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे आणि कारवाई करणे या मुद्यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांच्यातच जुंपल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले.
सिमेंटरोड निर्मितीदरम्यान आवश्यक तो दर्जा न पाळल्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या परिसरातील वातावरणात सिमेंटकणांचे गहिरे आच्छादन निर्माण झाले आहे. अनेक महिन्यांपासून या सिमेंटकणांचे श्वसन सुरू असल्यामुळे असंख्य लोकांना श्वसनासंबंधीचे विकार उद्भवले आहेत. संवेदनशील आणि वयस्क लोकांना या प्रदूषणाचा जीवघेणा त्रास होतो आहे.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रदूषणाच्या नियंत्रणाची गरज व्यक्त करताना घटनास्थळ महापालिका क्षेत्रात असल्यामुळे कारवाईचे क्षेत्रही त्यांचेच असल्याचे 'लोकमत'शी बोलताना सांगितले. यापूर्वीही जनरेटरच्या धुराने निर्माण केलेल्या प्रदूषणाच्या अनुषंगाने आम्ही महापालिकेला कारवाईसाठीचे पत्र लिहिले होते, असे सांगतानाच आता पुन्हा महापालिकेला संबंधितांवर कारवाई करण्यासंबंधीचे पत्र पाठविले जाईल, अशी माहितीही दिली.
महापालिकेच्या पर्यावरण विभागात यासंबंधाने संपर्क साधला असता, प्रदूषण नियंत्रणाचे काम मुळात प्रदूषण नियंत्रण मंडळाचेच आहे. कारवाई त्यांनीच करायला हवी, अशी भूमिका घेतली.
बांधकामाशी संबंधित कांतीलाल शहा, राजन शहा, तुषार शहा, राजेश लांबे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांच्या 'चलता है' या भूमिकेमुळे हजारो लोकांचे जिणे कठीण झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शासकीय आणि महापालिकेचे निमशासकीय अधिकारी कच खातात आणि लोकांच्या आरोग्याशी छळ होऊ देतात, हेच काय प्रदूषणमुक्त भारतासाठीचे प्रयत्न, असा प्रश्न निर्माण होतो.
रस्ते झाडले, पाणी शिंपडले
'पीडब्ल्यूडीचे काम कसे गोलमोल, अमरावती तू माया संग गोड बोल' हे वृत्त प्रकाशित केल्यावर सोमवारी कंत्राटदार कंपनीने सिमेंटरोडवर साचलेला सिमेंटचा थर काढण्यासाठी रस्ते झाडले. रस्त्यावर टँकरने पाणी शिंपडले. देखाव्यासाठी हे केले असले तरी प्रदूषण नियंत्रणाचे मूळ उपाय या कंपनीने टाळलेलेच आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यासंबंधाने काय कारवाई करते, याकडे लोकांचे लक्ष आहेच.