‘जेपीई’च्या निकृष्ट कामांमुळे आजारात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:03 PM2018-02-17T23:03:06+5:302018-02-17T23:03:32+5:30
निकृष्ट दर्जा आणि ढिसाळ नियोजन असलेल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे नागरिकांना त्रस्त करून सोडलेल्या जे.पी. एन्टरप्रायझेस या कंपनीमुळे शहरवासीयांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : निकृष्ट दर्जा आणि ढिसाळ नियोजन असलेल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे नागरिकांना त्रस्त करून सोडलेल्या जे.पी. एन्टरप्रायझेस या कंपनीमुळे शहरवासीयांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. मुख्य अभियंता विवेक साळवे यांच्या आश्चर्यकारक ढिलाईने नागरिकांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जे.पी. एन्टरप्रायझेस या मुंबईच्या कंपनीकडे अमरावती शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्यांची कामे आहेत. सदर कंपनी मुंबईची असल्यामुळे आणि केवळ नफा कमविण्यापुरतीच तिचा अमरावती शहराशी संबंध असल्याने कामाची दीर्घकालीन गुणवत्ता आणि कामादरम्यान शहरवासीयांच्या अडचणींची जाणीव ठेवून केलेले नियोजन यापैकी कुठल्याही मुद्द्याचे सदर कंपनीने भान ठेवलेले नाही.
यत्र तत्र सर्वत्र सिमेंट कण
डॉ. पंजाबराव देशमुख चौक ते इर्विन चौकापर्यंत, कठोरा मार्ग, बडनेरा मार्ग आणि बसस्थानकासमोर निर्माणाधीन सिमेंट रोडवरील सिमेंट आणि चुरीतील कण वातावरणात सतत आच्छादलेले असतात. रस्त्यावर टाकण्यात आलेली चुरी आणि कामादरम्यान रस्त्यावर राहिलेले अनावश्यक सिमेंट याचे बारीक कण वातावरणात संचारतात. सिमेंट आणि दगडांचे हे कण असल्यामुळे मातीच्या कणांच्या तुलनेत ते फारच घातक आहेत. त्यांचे विघटन होत नाही. श्वसनमार्गात प्रविष्ट होऊन ते कण श्वासनलिकेत आतून चिकटून बसतात. त्यामुळे घसा आणि श्वसनाच्या आजारांत मोठी वाढ झाली आहे. ज्यांना दमा वा तत्सम आजार आहेत, त्यांना अक्षरश: त्या आजाराचे अटॅक आलेत. वृद्ध आणि या आजाराचे अतिसंवेदनशील रुग्ण प्रमाणाबाहेर वाढलेल्या सिमेंट कणांमुळे अत्यंत त्रस्त झाले आहेत.
कॅम्प रोडवरील स्वच्छ आणि आलिशान कार्यालयातील बंदद्वार एसी कक्षात बसून राहणाºया मुख्य अभियंता विवेक साळवे यांचे रस्त्याच्या कामावर विभागात अंतिम नियंत्रण आहे; तथापि बांधकामस्थळी त्यांची नियमित व्हिजिट होत नसल्याने सामान्यांना होणाºया जीवघेण्या त्रासाची जाणीव त्यांना नाही. 'जेपीई'चे लोक विवेक साळवे यांना त्यांच्या कक्षात भेटून जे रिपोर्टिंग करतात, तेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते.
सिमेंट कणांमुळे वाढलेल्या रुग्णांच्या गर्दीतील कुणी एक अतीव-असह्य त्रासाने दगावलेच, तर मुख्य अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करविण्यासाठी न्यायालयातही जाऊ, या मराठा-कुणबी ग्रुप अध्यक्षांच्या वक्तव्याला म्हणूनच गांभीर्य प्राप्त होते.
श्वसनाच्या आजारात अचानक भरमसाठ वाढ आढळून आली आहे. वातावरणातील बदल आणि शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेले वायुप्रदूषण हे त्यामागील कारण असू शकते.
- डॉ. मनोज निचत, एमडी
प्रमुख, श्रीकृष्ण हॉस्पिटल
सिमेंट रोडमुळे लोक कमालीचे वैतागलेत. काम सहनशीलतेपलीकडे लांबले. सुरक्षेचे उपाय कामावर नाहीत. मुख्य अभियंत्यांचे नियंत्रण नाही. जनहितार्थ आक्रमक गनिमी कावा आंदोलन छेडू.
- प्रवीण रावसाहेब देशमुख
अध्यक्ष, मराठा-कुणबी ग्रुप