रूळांना भेगा, जबलपूर एक्सप्रेसचा अपघात टळला
By Admin | Published: January 23, 2015 12:44 AM2015-01-23T00:44:53+5:302015-01-23T00:44:53+5:30
कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळांवर भेगा पडल्याने गुरुवारी जबलपूर एक्सप्रेसचा भीषण अपघात टळला. ही घटना सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान
अमरावती : कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळांवर भेगा पडल्याने गुरुवारी जबलपूर एक्सप्रेसचा भीषण अपघात टळला. ही घटना सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान येथील गोपालनगर रेल्वे फाटकावर घडण्यापूर्वीच चालकाच्या निर्दशनास आल्याने हा अपघात टळला. त्यामुळे तब्बल ४० मिनिटे ही गाडी थांबविण्याचा प्रसंग रेल्वे प्रशासनावर ओढावला होता, हे विशेष.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जबलपूर-अमरावती एक्सप्रेस ही गाडी नागपूरहून अमरावतीकडे कॉर्डलाईनने येत असताना गोपालनगर रेल्वे फाटकाच्या परिसरात चालकाला लांबून रुळात भेगा पडल्याचे दिसून आले. गाडी पुढे नेल्यास भीषण अपघाताची शक्यता निदर्शनास आल्याने चालकाने प्रसंगावधान दाखविले. ज्या ठिकाणी रुळांवर भेगा पडल्या आहेत, त्या ठिकाणापासून काही अंतरावर चालकाने गाडी थांबविली व अमरावतीच्या स्टेशन प्रबंधकांना सूचना दिली. रेल्वे रुळात भेगा पडल्याची बाब लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. रेल्वे अधिकाऱ्यांची सुध्दा धावपळ सुरु झाली.
काही वेळाने रुळांवरील भेगांच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले. हा प्रकार ४० ते ५० मिनिटे सुरू होता. रुळ व्यवस्थित असल्याचे अधिकाऱ्यांनी कळविताच ही गाडी अमरावती स्थानकावर पुढे नेण्यात आली.
थंडीमुळे रुळात भेगा पडण्याचा प्रकार होत असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, चालकाने सावधगिरी बाळगली नसती तर जबलपूर एक्सप्रेसला भीषण अपघात झाला असता, या बाबीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.
प्रवासी बचावले : गोपालगनरात ४० मिनिटे थांबली गाडी
अन् अभियांत्रीकी विभागाची चमू पोहोचली
रुळात भेगा पडल्यामुळे जबलपूर एक्सप्रेसचा अपघात टळल्याची वार्ता रेल्वे अधिकाऱ्यांच्या कानावर पोहचताच एकमेकांशी संवाद सुरु केला. नेमके कोणत्या ठिकाणी रेल्वे रुळात भेगा पडल्या याची माहिती मिळताच बडनेऱ्यातील अभियांत्रिकी विभागाची चमू गोपालनगरात घटनास्थळी पोहोचली. अवघ्या २५ मिनिटातच रुळात पडलेल्या भेगा दुरुस्त करण्यात आल्यात. त्यानंतर ही जबलपूर एक्सप्रेस अमरावती रेल्वे स्थानकावरून पुढे रवाना करण्यात आली.