राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्यात आरक्षण हाऊसफुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:17 AM2021-08-20T04:17:48+5:302021-08-20T04:17:48+5:30
खिडक्यांवर झळतेयं ‘नो रूम’, मुंबई, पुणे मार्गे रेल्वे ३१ ऑगस्टपर्यत आरक्षण मिळेना अमरावती : अनलॉक होताच बरेच काही सुरळीत ...
खिडक्यांवर झळतेयं ‘नो रूम’, मुंबई, पुणे मार्गे रेल्वे ३१ ऑगस्टपर्यत आरक्षण मिळेना
अमरावती : अनलॉक होताच बरेच काही सुरळीत होत आहे. अशातच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली असून, राखी पौर्णिमेमुळे बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण हाऊसफुल्ल आहे. विशेषत: मुंबई, पुणे मार्गावर ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत ‘नो रूम’ आहे. त्यामुळे रक्षाबंधनासाठी बहिणीच्या भेटीला येणाऱ्या भावांना अथडळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.
रक्षाबंधन हा रविवार, २२ ऑगस्ट रोजी आहे. मात्र नवविवाहितांना माहेरी जाऊन भावाला राखी बांधण्याची ओढ लागली आहे.
अशातच रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्या आरक्षण हाऊसफुल्ल असल्याने खासगी अथवा ट्रॅव्हल्र्सने प्रवास करुन बहिणीच्या भेटीला भावाला जावे लागेल, असे चित्र आहे. लांब पल्ल्यासह मुंबई, पुणे मार्गे ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यात ऑगस्टपर्यंत आरक्षण नसल्याचे फलक रेल्वे खिडक्यांवर झळकत
आहे.
--------------------------
सध्या सुरू असलेल्या गाड्या
अमरावती- मुंबई, अमरावती-पुणे, अमरावती-तिरूपती, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, हावडा- मुंबई गितांजली, ओखा-पुरी द्धारकानाथ एक्स्प्रेस, नागपूर- दादर सेवाग्राम एक्स्प्रेस, हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस, अहमदाबाद-
चैन्नई नवजीवन, नागपूर-पुणे गरीबरथ, पुणे-अमरावती एक्स्प्रेस, गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस.
-----------------------
या गाड्यांना ‘वेटिंग‘
गोंदिया- मुंबई विदर्भ - स्लिपर ८९ वेटिंग, एसी १२ वेटिंग
अमरावती- मुंबई एक्सप्रेस- स्लिपर ६४ वेटिंग, एसी १८ वेटिंग
नागपूर- पुणे गरीबरथ - स्लिपर ६७ वेटिंग, एसी २४ वेटिंग
हावडा- मुंबई मेल - स्लिपर ७८ वेटिंग, एसी ४२ वेटिंग
गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र - स्लिपर ५४ वेटिंग, एसी २८ वेटिंग
----------------
४० टक्के प्रवासी संख्या वाढली
- कोरोनाकाळात नागरिक घरीच ‘लॉक’ होते. मात्र, शासनाने ‘अनलॉक’ निर्णय घेताच कामानिमित्त लोक बाहेर पडू लागले आहे. विशेषत: प्रवासासाठी आता रेल्वेला पसंती दिली जात आहे.
- राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. पुणे, मुंबई मार्गावरील एकुणच गाड्या हाऊसफुल्ल असल्याचे फलक झळकत आहे. परिणामी अनेकांना रेल्वेशिवाय प्रवास करून घर गाठावे लागणार आहे.
- अनलॉक होताच रेल्वे गाड्यांत ३५ ते ४० टक्के प्रवासी संख्या वाढली आहे. अशातच रेल्वेच्या विशेष गाड्यांमध्ये आरक्षणाविना प्रवास नाही. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.