मुख्यमंत्री दत्तक गावात भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:07 PM2018-04-21T22:07:21+5:302018-04-21T22:07:56+5:30
तालुक्यातील शिरजगाव मोझरी गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावाला विशेष सुविधा मिळतील व गावाचा विकास झपाट्याने होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुक्यातील शिरजगाव मोझरी गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावाला विशेष सुविधा मिळतील व गावाचा विकास झपाट्याने होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र, त्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. येथील नागरिकांची तहान भागविण्यासाठी अधिग्रहित केलेले बोअरवेलचे पाणीदेखील अचानक आटले. दोन-तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सोसत असलेल्या शिरजगाववासीयांना मे महिन्यात काय होणार, असा प्रश्न पडला आहे.
शिरजगाव मोझरी येथे एकच विहीर असून, त्यामध्ये अधिग्रहित केलेल्या बोअरवेलचे थोडे पाणी साठवून, नंतर टाकीतून गावासाठी पुरवठा होतो. गावातील एकूण १४ हातपंपांपैकी तीन हातपंपांचे पाणी पिण्यायोग नाही. काही हातपंप भंगार अवस्थेला पोहोचले, तर काही आटले आहेत. गावातील नळयोजनेचे पाणी पाच ते सहा दिवसानंतर मिळते. तेही अपुरे पाणी मिळत असल्याने ग्रामस्थ उन्हातान्हात दूरदुरून पाणी आणत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी गावातीलच सदानंद भालेराव यांनी विहिरीसाठी जागा दिली. विहिरीचे काम चालू झाले. परंतु, इतक्या दिवसापासून ते काम अजूनही पूर्ण झाले नाही. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत अशीच स्थिती असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे.
पाण्यासाठी लागले गुन्हे
मागील उन्हाळ्यात शिरजगाव मोझरी येथील ग्रामस्थांनी पाणी समस्येवर ग्रामपंचायतला कुलूप ठोकले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांवरदेखील गुन्हे दाखल केले होते. अजूनही गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. हक्काच्या पाण्यासाठी आता पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत गावकरी आहेत.
प्रशासनाच्या सहकार्याने योजना सहा महिन्यांत होऊ घातली आहे. जमिनीतच पाणी नसल्याने टंचाई आहे. म्हणून भूजलपातळी वाढवण्यासाठी कामे हातात घेतली आहेत. त्याअंतर्गत कामे जून अखेरीस पूर्ण होतील.
- स्वप्निल देसले, मुख्यमंत्री प्रतिनिधी, शिरजगाव मोझरी