सिमेंटरोडमुळे दुकानांना टाळे, उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:47 PM2018-02-14T22:47:10+5:302018-02-14T22:48:04+5:30
शहराचा कायापालट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिमेंटरोडमुळे शहरातील दुकानांनाच टाळे लागू लागल्याने 'विकास नको, जीवन हवे' अशा संवेदनशील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सिमेंट रस्त्याची उपयोगिता त्यामुळे ऐरणीवर आली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शहराचा कायापालट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिमेंटरोडमुळे शहरातील दुकानांनाच टाळे लागू लागल्याने 'विकास नको, जीवन हवे' अशा संवेदनशील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सिमेंट रस्त्याची उपयोगिता त्यामुळे ऐरणीवर आली आहे.
पंचवटी ते इर्विन चौकापर्यंतचे सिमेंटरोडचे काम सुरू होऊन सहा-सात महिन्यांचा कालावधी उलटला. नियोजनाचा ढिसाळ नमुना असलेले हे काम तरीही अपूर्णच आहे. एकाच बाजूचे काम पूर्ण व्हायचे असल्यामुळे दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण होण्यास पुन्हा सहा महिने अलगद उलटतील. काम सुरू करताना स्थानिक व्यावसायिकांचा जराही विचार न केल्याने दुकानदारांना व्यवसाय करण्यास मुभाच उरली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संबंधितांनी वारंवार तक्रारी केल्या असतानाही त्याचा मुळीच लाभ झाला नाही. मुख्य अभियंता विवेक साळवे आणि त्यांच्या चमुचे या तमाम मुद्यांवर नियंत्रण असायलाच हवे होते; तथापि कंत्राटदाराला 'दुखविण्या'ची त्यांचीही इच्छा नसावी, अशा पद्धतीने त्यांनी सामान्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचमुळे 'विकास हवा असेल तर वेदना सहन कराव्याच लागतील', अशी असंवेदनशील प्रतिक्रिया जे.पी.एन्टरप्रायझेस या कंपनीद्वारे दिली जाते.
जिल्हा स्टेडियम संकुलातील मेलडी कॅफे हे दुकान इतके चालायचे की तरुणाईच्या तेथील सततच्या गर्दीमुळे इतरांची तक्रार असायची. रस्त्याच्या कामापासून व्यवसाय ठप्प पडला. दुकान मालकाला दरमहा द्यावयाचे ३० हजार रुपये भाडे आणि चाकरांना द्यावयाचे वेतनही निघू शकत नसल्याने अखेर दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती दुकानचालक उल्हास खालखोनीकर यांनी दिली. मोठ्या वाहनांचे काच लावण्यात नावाजलेल्या आशीर्वाद ग्लास या प्रतिष्ठानात सहा महिन्यांत एकही वाहन आले नसल्याची माहिती सुनील कोलटकर यांनी दिली. सीटकव्ह आणि दुचाकी सजविण्यासाठीचे प्रतिष्ठान असलेल्या प्रगती हेल्मेटचे वैभव बैतुले म्हणाले दुकानाचे १५ हजार रुपये भाडे आणि कामाला असलेल्या कर्मचाºयांचे वेतन देणे शक्यच नाही. ९० टक्के व्यवसाय ठप्प पडलेला आहे. अखेर येथील कर्मचारी दुसºया दुकानात पाठविणे भाग पडले. याच संकुलात असलेल्या दोन दुचाकी दुरुस्ती केंद्रांमध्ये हीच स्थिती आहे.
नागरिकांना दिलासा, कारवाईची मागणी
जेपीई बांधकाम कंपनी करीत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आणि कठोरा मार्गावरील लोकांना नाहक बंदिवास सुरू असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केल्यावर त्या परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या कंपनीची केवळ दंडुकेशाही सुरू असून सौजन्य काय असते, हे कंपनीच्या अभियंत्यांना आणि कर्मचाºयांना जराही ठाऊक नसल्याच्या वेदना नागरिकांनी 'लोकमत'कडे बोलून दाखविल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रारी करूनही कुणीच आमची दखल घेतली नाही. शासकीय अधिकाºयांच्या बळामुळेच विकासाच्या नावावर आमचे जीवघेणे हाल सुरू असल्याचे कठोरा रोडवरील नागरिक 'लोकमत'ला सांगत होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी वृत्ताची दखल घेतली; तथापि सर्वच वरिष्ठ अधिकाºयांची मुंबईला बैठक असल्यामुळे मुख्यालयी कुणीच उपस्थित नाही. कारवाईबाबतचा त्यांचा निर्णय त्यांच्या आगमनानंतरच कळू शकेल.
धामणगावचा रस्ता गाजला
धामणगावचा रस्ता तडे आणि भेगा गेल्यामुळे अपघातप्रवण झाला आहे. भेगांमुळे सायकलचे टायर घसरतात आणि तोल जाऊन अपघात होतो, अशी माहिती तेथील नागरिकांनी फोन करून 'लोकमत'ला दिली. यासंबंधाने त्या परिसरातील जागरूक लोकप्रतिनिधींनी गंभीर दखल घेतली. रस्त्याची पाहणीही केली. विवेक साळवे रस्त्याच्या या मुद्यावर कसे व्यक्त होतात, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.