कडक लॉकडाऊनमुळे गल्लीबोळांतही शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:56+5:302021-05-12T04:13:56+5:30
कोरोनाची धास्ती; नागरिक स्वत:हून घेऊ लागले काळजी अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ९ मेपासून कडक ...
कोरोनाची धास्ती; नागरिक स्वत:हून घेऊ लागले काळजी
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ९ मेपासून कडक लॉकडाऊन लागू केला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गापासून सुरक्षित राहता यावे, याकरिता पूर्वीपेक्षा नागरिक आता अधिक दक्षता घेताना दिसत आहेत. सध्या कडक लॉकडाऊन असल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातही शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. सकाळी ११ पर्यंत कॉलनी, वस्तीत नागरिक दिसत असले तरी दुपारी १२ पासून मात्र अनेक कुटुंबे घरातच राहत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनाने लागू केलेल्या कडक लॉकडाऊन व त्याकरिता लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचाही बराच प्रभाव लोकवस्तीत दिसू लागला आहे. सकाळी माॅर्निग वॉक करताना नागरिक बाहेर दिसत असतात, तर तुरळक प्रमाणात घराबाहेर कामानिमित जात असले तरी दुपारी मात्र सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. गतवेळच्या कोरोना लाटेपेक्षा आताची कोरोना लाट भयावह आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या व होत असलेल्या मृत्यूची संख्या पाहता, नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी केलेल्या सूचनेप्रमाणे अनेक ठिकाणी नियमित मास्कचा वापर, नियिमत हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे आदी त्रिसूत्रीचे पालन नागरिक करताना दिसत आहेत. असेच काटेकोर पालन प्रत्येक नागरिकाने स्वत:हून केल्यास नक्कीच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखला जाऊ शकतो.
कोट
कोरोनाचा वाढता संसर्ग व यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या व मृत्यूचे आकडे ही बाब लक्षात घेता, कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केल्यास यापासून प्रत्येक जण सुरक्षित राहू शकतो.
- डी.एस. गावंडे, नागरिक
कोट
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेला कडक लॉकडाऊन हा जनतेच्या हिताचाच आहे. कोरोनाचा संसर्गापासून दूर राहण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडण्यापेक्षा आपल्या घरीच राहून सुरक्षित राहणे बरे.
- मधुकर फरदळे, नागरिक