उन्हामुळे जनावरांच्या आजाराचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 14:09 IST2024-04-29T14:04:44+5:302024-04-29T14:09:08+5:30
पशुधनाची काळजी घ्या; 'पशुसंवर्धन'चे आवाहन

Cattles need special care in this hot summer
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे: सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने पशुधनावर देखील विपरीत परिणाम होऊ लागला आहे. सध्या जनावरांमध्ये वाढते आजाराचे प्रमाण लक्षात घेता पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पशुपालकही मोठ्या प्रमाणात आहेत. एप्रिल महिन्यात तापमान ४२ अंशांवर गेले आहे. या तापत्या उन्हाचा परिणाम जसा मनुष्यावर पडत आहे. तसाच परिणाम जनावरांवरसुद्धा पडत असतो. त्यामुळे पशुपालकांना जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे, आदी सूचना करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून पारा वाढला आहे. दररोज ४२ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत आहे. उन्हापासून नागरिक जसे उपाययोजना करीत आहेत. तशाच पद्धतीने जनावरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
अशी घ्यावी पशुधनाची काळजी
उन्हाळ्यात जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना चारण्यास सोडावे, हवामान पूरक सुधारित गोठे बांधावेत, गोठ्यांची उंची जास्त असावी, गोठ्यात हवा खेळती ठेवावी, छपराला शक्यतो पांढरा चुना अथवा रंग लावावा. त्यावर पालापाचोळा पाचट टाकावे, परिसर थंड राहण्यासाठी झाडे लावावीत.
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे ढगाळ वातावरण व पाऊस येत असला तरी उन्हात जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे सकाळी व सायंकाळी जनावरे चारण्यासाठी न्यावे तसेच वेळेवर पाणी पाजावे. वेळप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा
- आर. जी. राऊत, पशुधन अधिकारी, धामणगाव रेल्वे