बेसावधपणामुळे रेल्वेने कटून एकाचा मृत्यू, एक गंभीर
By Admin | Published: March 3, 2016 12:23 AM2016-03-03T00:23:17+5:302016-03-03T00:23:17+5:30
रोजगारासाठी हजारो किलोमिटरचा प्रवास करून शहात आलेले दोन युवक मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास राजापेठ रेल्वे क्रॉसिंगजवळील रेल्वे रुळावर बसले होते.
अमरावती : रोजगारासाठी हजारो किलोमिटरचा प्रवास करून शहात आलेले दोन युवक मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास राजापेठ रेल्वे क्रॉसिंगजवळील रेल्वे रुळावर बसले होते. बेसावधपणामुळे बडनेरा-अमरावती रेल्वे खाली येऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला दोन्ही पाय गमावावे लागले.
मनोज हरिनंदन पांडे (३०) असे मृताचे तर नरसिंग रामधन उरे (२९, दोन्ही राहणार भरतपूर, (जि. सरगुजा, छत्तीसगड) असे गंभीर जखमीचे नाव आहे. जखमीचे दोन्ही पाय रेल्वेने कटले होत. तब्बल पाऊण तास उशिरा मदत मिळाल्याने तो तडफडत राहिला. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगच्या उड्डाणपूलाचे काम सुरु झाले आहे. यासाठी कंत्रादाराने छत्तीसगड येथील काही मजूर आणले आहेत. मनोज पांडे व नरसिंग उरे हे दोघेही याच कामावर आले होते.
मंगळवारी रात्री काम आटोपून मद्यधुंद अवस्थेत रेल्वे रुळावर बसले होते. अचानक बडनेरा-अमरावती रेल्वेने दोघानाही चिरडले. मनोजचा घटनास्थळी मृत्यू झाला तर नरसिंगचे दोन्ही पाय धडावेगळे झाले. अंधारामुळे कोणाचेही या अपघाताकडे लक्ष गेले नाही.जखमीने आरडाओरडा केला असता आसपासच्या नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. शेवटी पाऊण तासानंतर एका आॅटोरिक्षाद्वारे जखमीला इर्विनमध्ये पाठविण्यात आले.पश्चात राजापेठ पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सेवानिवृत्त पीएसआयने नेले नागपूरला
रेल्वे रुळावर अत्यवस्थ पडलेल्या नरसिंगला सेवानिवृत्त पीएसआय जामनिक यांनी मदतीचा हात दिला. दोन्ही पाय गमावलेल्या नरसिंगला त्यांनी स्वखर्चाने नागपूरला नेले आहे. तसेच ते स्वत: नरसिंगसोबत रुग्णवाहिकेत गेले. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने एका परप्रांतिय तरूणाची मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.