जलपर्णीमुळे नद्यांचा श्वास गुदमरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 09:33 PM2018-11-10T21:33:50+5:302018-11-10T21:34:34+5:30
कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील नद्या फारशा प्रवाहीत नाहीत. त्यामध्ये गावागावांतील सांडपाणी सोडण्यात येते. पात्रातही मोठ्या प्रमाणावर चिला, जलपर्णी व शेवाळाचा थर साचल्याने प्रवाह दिसेनासा झाला आहे. पात्रात बेशरम वाढल्याने पाणी विषाक्त झाले आहे. त्यामुळे मानवासह जनावरांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील नद्या फारशा प्रवाहीत नाहीत. त्यामध्ये गावागावांतील सांडपाणी सोडण्यात येते. पात्रातही मोठ्या प्रमाणावर चिला, जलपर्णी व शेवाळाचा थर साचल्याने प्रवाह दिसेनासा झाला आहे. पात्रात बेशरम वाढल्याने पाणी विषाक्त झाले आहे. त्यामुळे मानवासह जनावरांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
केंद्र शासनाने स्वच्छता अभियानाचा मोठा गाजावाजा केला. मात्र, गावागावांतील लहान-मोठ्या नद्या व नाल्यांची स्वच्छता कधी झालीच नाही. जलयक्त शिवारमध्ये ही कामे करण्याचे जिल्हा प्रसासनाला कधीही सुचलेच नाही. त्यामुळे नदीपात्रांना बकाल स्वरूप आले असून नद्या आता गटारगंगा बनल्याचे दुर्देवी चित्र बहुतेक गावांत पाहायला मिळते.
यंदाच्या पावसाळ्यात नद्यांना पूर गेलाच नाही. त्यामुळे पात्रात मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे. बहुतांश गावांत नदी-नाल्यांवर बंधारे बांधल्याने वाहत्या नद्यांचा प्रवाह खोळंबला. यामध्ये गावातील सांडपाण्याने भर घातली. लहान-मोठ्या कारखान्याचे प्रदूषित पाणी नदी-नाल्यांत सोडण्यात येत असल्याने शुद्ध पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या नद्यांना गटारीचे स्वरुपा आले आहे. नदी-नाल्यांचा प्रवाह खोळंबल्याने पाण्यात घाण वाढली. यामध्ये जलपर्णीची भर पडली व संपूर्ण नदीपात्रच घाणीच्या विळख्यात सापडले आहे. आरोग्यास हाणीकारक असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून नद्यांची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे.
शहरात अंबानाल्यासह सातुर्नाचा नाला हा दलदलीने बुजला आहे. या नाल्यात चमकुºयाची झाडे व जलपर्णी असल्यामुळे अनेकदा ही दलदल लक्षातही येत नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत असल्याने लगतच्या वस्त्यांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेद्वारा नाल्यांची सफाई होत नसल्यामुळे नाले आता नागरिकांच्या जीवावर उठले आहेत.
सांडपाण्यावर भाजीपाला
शहरातील सांडपाणी ज्या नाल्यांमध्ये सोडले जाते, त्याच सांडपाण्यावर शहरालगतच्या शेतांमध्ये भाजीपाला पिकविला जातो व हाच भाजीपाला शहरात विकला जातो. अत्यंत घातक रसायने यात असल्यामुळे मानवी आरोग्यासाठी हा अत्यंत घातक आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारा यावर अद्याप कोणतीही कारवार्ई करण्यात आलेली नाही, हे विशेष.
दूषित पाण्यामुळे त्वचेचे रोग
नदी-नाल्यांचे प्रदूषित पाणी वापरास अत्यंत घातक आहे. या घाण पाण्याचा त्वचेशी संपर्क आल्यास त्वचेवर खाज आदी होत असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात या दूषित व घाण पाण्यात कपडे धुतले जातात. त्यामुळे त्वचेचे विकार होत आहेत. तसेच हे पाणी जनावर पीत असल्याने त्यांनादेखील तोंडखुरी आदी आजार होत आहेत.
नदीपात्रात टाकला जातो कचरा
शहरातील नाले असो की गावातील नद्या यामध्ये सांडपाणी व कारखाण्याचे प्रदुषीत पाणी सोडल्या जाते. तसेच गावासह शहरातील कचरा यामध्ये टाकल्या जातो. अनेक पात्रात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. याच पाण्यात भाजीपालादेखील धुतला जातो. या घाण पाण्यामुळे दुर्गंधी वाढत असून, या प्रकारामुळे थेट आजारास निमंत्रण आहे.