टपाल खात्याच्या चुकीच्या नियोजनामुळे नोकरी हुकली
By admin | Published: July 14, 2017 12:43 AM2017-07-14T00:43:40+5:302017-07-14T00:43:40+5:30
टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे एका युवकावर नोकरी गमाविण्याची वेळ आली. लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीचे कॉल लेटर
युवकाचे नुकसान : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे एका युवकावर नोकरी गमाविण्याची वेळ आली. लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीचे कॉल लेटर दोन दिवस उशिरा प्राप्त झाल्याने थेट मुलाखतीस पोहोचू न शकल्याने सदर तरूणाची "आॅर्डनन्स फॅक्टरी"त नोकरीची संधी हुकली. संबंधित डाक विभागाचा गलथान कारभार व चुकीचे नियोजन यास जबाबदार असल्याचा आरोप त्या युवकाने केला आहे. त्याला न्याय कोण देणार,हा प्रश्न पडला आहे.
चेतन गंगाधर बोबडे, सदर युवकाचे नाव असून त्याने मार्च २०१७ मध्ये आॅर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे नोकरीसाठी अॅप्लिकेशन केले होते. त्याची २४ जून रोजी मुलाखत असल्याचे पत्र सदर युवकाला पाठविले होते. परंतु वलगाव येथील पोस्टमनने ते पत्र २९ जून २०१७ रोजी दुपारी २.१० वाजता प्राप्त झाले. पण या नोकरीसाठी इंटर्व्ह्य त्याच दिवशी सकाळी ९ वाजता असल्याने तो पुणे येथे पोहचू शकला नाही. याला सदर डाक विभागाचे चुकीचे नियोजन व पोस्टमनचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप अन्यायग्रस्त चेतन बोबडे यांनी "लोकमत"शी बोलताना केला आहे.
याची चौकशी या युवकाने केली असता सदर मुलाखत पत्र २४ जून रोजीच वलगाव पोस्टाला प्राप्त झाले होते. परंतु मुलाखतपत्र येथील संबंधित पोस्टमन युवकाला वेळेच्या आता दिले नाही. यासंदर्भाची तक्रार चेतन याने वलगावच्या पोस्टमास्टरकडे लेखी स्वरूपात केली आहे. संबंधितांवर कारवार्इंची अपेक्षा केली आहे. तसेच यासंदर्भाची तक्रार त्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडेसुध्दा केली आहे. डाक विभागाचा कारभार विश्वासू मानला जातो. पण काही बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे डाक विभागाला खाली पाहण्याची वेळ आली आहे. याबाबत प्रवर डाक अधीक्षकांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.