डफरीन रुग्णालयातील बाळ जन्मताच आधार कार्ड योजना वर्षभरापासून बंदच
By उज्वल भालेकर | Published: April 2, 2024 08:10 PM2024-04-02T20:10:27+5:302024-04-02T20:10:35+5:30
पाच महिनेच चालली योजना, डाक विभागाचा हलगर्जीपणा
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे बाळ जन्मताच त्याचे आधार कार्ड काढण्याची योजना सुरू केली होती. ही योजना रुग्णालय प्रशासन व पोस्ट ऑफिसच्या मदतीने सुरू करण्यात आली होती; परंतु वर्षभरापासून या योजनेला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. रुग्णालयात आधार कार्ड काढून देण्यासाठी पोस्ट ऑफिसचे कर्मचारीच येत नसल्याने वर्षभरात डफरीनमध्ये जन्म घेतलेल्या एकाही बाळाचे आधार कार्ड निघाले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) यासाठी नवजात बालकांची आधार कार्डसाठी नोंदणी करण्याची सुविधा रुग्णालयात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बाळ जन्मताच आधारकार्ड ही योजना सर्वप्रथम राज्यात जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे सुरू करण्यात आली होती. डिसेंबर २०२२ पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे मार्च २०२३ पर्यंत डफरीन रुग्णालयात जन्मलेल्या जवळपास ७९८ बालकांचे आधार कार्डही काढण्यात आले.
यासाठी पोस्ट ऑफिसमधील दोन कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील रुग्णालयात केली होती. ते रोज रुग्णालयात जाऊन जन्म झालेल्या नवजात शिशूंचे आधार कार्ड तयार करत होते. यासाठी आई किंवा वडील दोघांपैकी एकाचे आधार कार्ड तसेच रुग्णालयातून देण्यात येणारे बाळाचे जन्म प्रमाणपत्र यावरून हे आधार कार्ड काढण्यात येत होते. परंतु, एप्रिल २०२३ पासून पोस्टातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात येणे बंद केल्याने नवजात शिशूंचे आधार कार्ड काढण्याला ब्रेक लागला. रुग्णालय प्रशासनाकडून यासाठी पोस्ट ऑफिस कार्यालयासोबत वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला; परंतु कर्मचारी येत नसल्याने अखेर या योजनेला ब्रेक लागला. वर्षभरानंतरही ही योजना पुन्हा एकदा सुरू होऊ शकलेली नाही.