डफरीन, इर्विन रुग्णालयातील चौकीला सीपींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:38 AM2017-12-05T00:38:32+5:302017-12-05T00:38:48+5:30
शासकीय रुग्णालयात येणाºया नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोमवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी जिल्हा सामान्य व जिल्हा स्त्री रुग्णालयातील पोलीस चौकीचा आढावा घेतला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शासकीय रुग्णालयात येणाºया नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोमवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी जिल्हा सामान्य व जिल्हा स्त्री रुग्णालयातील पोलीस चौकीचा आढावा घेतला. दरम्यान, त्यांनी महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित ठाण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या.
इर्विन व डफरीन रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांना दाखल करण्यात येते. अशा प्रसंगी त्यांच्या नातेवाइकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. याच वेळी गुन्हेगारीत सक्रिय असणारे गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी, पाकेटमारी व विनाकारण नागरिकांकडून पैसे उकळण्याचे काम करू शकतात. त्यातच रुग्णालयीन परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करणारे काही जण आढळून आले होते. या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने सोमवारी पोलीस आयुक्तांनी इर्विन व डफरीनचा आढावा घेतला.
डफरीनमध्ये नव्याने सुरू झालेल्या पोलीस चौकीत तीन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच इर्विन पोलीस चौकीला भेट देऊन आयुक्तांनी ठाणेदार दिलीप पाटील यांना सूचना देऊन गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.