डफरीन ओव्हरलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:26 PM2018-05-23T22:26:04+5:302018-05-23T22:26:34+5:30
जिल्हा स्त्री रुग्णालयात २०० बेडची व्यवस्था असताना दररोज ३५० ते ४०० महिला रुग्णांवर उपचार केले जात आहे. रुग्णांचा ओघ 'ओव्हरलोड' असतानाही योग्यरीत्या आरोग्यसेवा पुरविताना डॉक्टर व परिचारिकांची दमछाक होताना दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात २०० बेडची व्यवस्था असताना दररोज ३५० ते ४०० महिला रुग्णांवर उपचार केले जात आहे. रुग्णांचा ओघ 'ओव्हरलोड' असतानाही योग्यरीत्या आरोग्यसेवा पुरविताना डॉक्टर व परिचारिकांची दमछाक होताना दिसत आहे.
मनुष्यबळाचा अभाव असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ ५९ परिचारिका आरोग्यसेवेची धुरा सांभाळतात. जिल्हाभरातील गोरगरीब महिला प्रसूतीच्या उपचाराकरिता जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होतात. अनेक वर्षांपासून या रुग्णालयात २०० बेडचीच व्यवस्था आहे. त्या तुलनेत महिला रुग्णांच्या प्रवेशांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला रुग्ण दाखल होत असताना मनुष्यबळ तेवढाच आहे. रुग्ण अधिक व मनुष्यबळ कमी, अशी स्थिती असतानाही आरोग्य सेवा योग्यरीतीने सेवा पुरविण्यात डफरीन रुग्णालय अग्रेसर आहे. सोमवारी एकाच दिवशी ३९२, तर बुधवारी ३४३ महिलांवर डफरीन रुग्णालयात उपचार सुरू होता. त्यातच नवीन रुग्णांमध्ये ८९ महिलांची एन्ट्री झाली. दरम्यान दररोज १५ ते २० महिलांची प्रसूती होत आहे. अशा स्थितीत डॉक्टर व परिचारिका महिला रुग्णांना योग्य आरोग्यसेवा पुरवित असल्याचे दिसून येत आहे.
नवीन इमारतीचे काम युद्धस्तरावर
डफरीनमध्ये अधिसेविका व सहायक अधिसेविका ३ चे पद रिक्त आहे. तीन पाठ्य निर्देशिका आहेत. चिकित्सालयीन पाठ्यनिर्देशिकांची दोन्ही पदे रिक्त आहेत. बालरोग परिचारिकाची दोन पदे मंजूर आहे. त्यापैकी एकच पद भरण्यात आले. सार्वजनिक आरोग्य परिचारिकाची आठ पदे मंजूर असताना पाच पदे भरण्यात आली आहेत. अधिपरिचारिकांची ६० पदे मंजूर असताना ५९ पदे भरली आहेत. याच अधिपरिचारिकांवर आरोग्यसेवेची सर्वाधिक जबाबदारी आहे. डफरीन रुग्णालयातील वाढत्या रुग्णांची संख्या पाहता नवीन इमारतीत २०० बेडची व्यवस्था केली जाणार आहे. या नवीन इमारतीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या २०० बेडवरील महिलांच्या उपचारासाठी नवीन पदभरती होणार आहे. त्यावेळी डफरीन रुग्णालयातील सद्यस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांचा भार कमी होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
सात रुग्ण सांभाळते एक परिचारिका
डफरीन रुग्णालयात दररोज ३५० ते ४०० महिला रुग्णावर उपचार सुरु असतात. त्यामुळे सात महिला रुग्णांच्या आरोग्य सेवेची जबाबदारी एक परिचारिका सांभाळत असल्याची स्थिती आहे. प्रत्येक महिलांच्या प्रसुतीच्या उपचाराची जबाबदारी सांभाळण्यासाठी परिचारिकांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.