बांधकाम कार्यालयातील रस्ते खोदले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:32 PM2017-11-01T23:32:26+5:302017-11-01T23:32:44+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था जीवघेणी असल्याचा आक्षेप नोंदवित काँग्रेसने बांधकाम कार्यालयापुढेच रस्ते खोदून बुधवारी अभिनव आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था जीवघेणी असल्याचा आक्षेप नोंदवित काँग्रेसने बांधकाम कार्यालयापुढेच रस्ते खोदून बुधवारी अभिनव आंदोलन केले. यावेळी रस्ते सुधारण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी सभापती अविनाश मार्डीकर, राजा बांगडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. बांधकाम विभाग रस्ते निर्मितीच्या नावाखाली नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप कॉँग्रेसने केला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत चार ते पाच नागरिकांचा जीव गेला. या समस्येबाबत वारंवार अवगत करूनही बांधकाम विभागाने उपाययोजना केल्या नाहीत. आता तर शहरात ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे आठ दिवसांत बुजले नाहीत, तर अधीक्षक अभियंत्यांनाच दालनात कोंडून जाब विचारला जाईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.