'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:35+5:302021-07-19T04:10:35+5:30

---------------------------------------------------------------------------------------------- रुक्मिणी मातेची पालखी शिवशाहीने पंढरीला रवाना, महामारी टळो, वारी घडो - पालकमंत्र्यांनी घातले विठ्ठलाला साकडे तिवसा (अमरावती) : ...

Dumdumle Kaundanyapur with the chanting of 'Znanoba Tukaram' | 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर

'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर

Next

----------------------------------------------------------------------------------------------

रुक्मिणी मातेची पालखी शिवशाहीने पंढरीला रवाना, महामारी टळो, वारी घडो - पालकमंत्र्यांनी घातले विठ्ठलाला साकडे

तिवसा (अमरावती) : विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरला ओळखले जाते. आषाढी एकादशीला दरवर्षी माता रुक्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजेच पंढरपूरला जातात. १५९४ वर्षांपासून ही चालत आलेली सर्वांत जुनी परंपरा आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा रद्द झाली असली तरी पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिली. त्यात कौंडण्यपूर येथील रुक्मिणीच्या माहेरच्या पालखीचा समावेश आहे.

रविवारी एसटी बसने ४० वारकऱ्यांसह ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. यावेळी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेती पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे, असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्रीविठ्ठलाला घातले.

आषाढी वारीसाठी कौंडण्यपूरहून पंढरपूरला मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांच्या शिवशाही बसला रविवारी पालकमंत्री ठाकूर यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम'च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते श्रीक्षेत्र कौंडण्यपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व पालखीचे पूजन झाले. पालखी सोहळा, पांडुरंगनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाचा ताल यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पालखीचा ध्वज व तुळशी वृंदावन डोक्यावर वाहून पालखी मार्गस्थ केली. वारकरी भक्तांसह त्या फुगडीही खेळल्या. महिला व बाल कल्याण सभापती पूजा आमले, विश्वस्त विजय डहाके, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पदाधिकारी, वारकरी मंडळी यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

बॉक्स

मंदिरात पादुकांचे पूजन करून माता रुक्मिणीच्या ओटीसह विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून गावात पालखी काढण्यात आली. अंबिकादेवीच्या मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते, अशी आख्यायिका असलेल्या त्या अंबिकामातेच्या मंदिराजवळ पालखीचा पहिला विसावा झाला. त्या ठिकाणी वारकऱ्यांचे पहिलं रिंगणसुद्धा झाले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी रिंगण सोहळ्यात फुगडी खेळून वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यानंतर रुक्मिणीच्या पादुकांसह माता अंबिकादेवीच्या पादुकासुद्धा घेऊन गावाच्या वेशीवर टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी व गावातील लोकांनी पालखीला निरोप दिला.

कोट

कोरोनाचे नियम पाळून पालखी निघाली आहे. या पालखीसोबत प्रशासनाच्यावतीने मी असणार आहे. सोबत रुग्णवहिका, डॉक्टरांची टीम आहे. प्रशासन वारकऱ्यांच्या सेवेत आहे.

- वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा

Web Title: Dumdumle Kaundanyapur with the chanting of 'Znanoba Tukaram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.