डांबरात भेसळ; टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:38 PM2018-05-11T22:38:57+5:302018-05-11T22:38:57+5:30
अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने डांबरात रसायनाची भेसळ करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी गुरुवारी पदार्फाश केला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी गुरुवारी मध्यरात्री नांदगाव पेठ हद्दीतील पिंपळविहीर स्थित एका धाब्यावर धाड टाकून सहा आरोपींना अटक केली. घटनास्थळावरून ७० ड्रम रसायन, दोन टँकर, १०० रिकामे ड्रम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने डांबरात रसायनाची भेसळ करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी गुरुवारी पदार्फाश केला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी गुरुवारी मध्यरात्री नांदगाव पेठ हद्दीतील पिंपळविहीर स्थित एका धाब्यावर धाड टाकून सहा आरोपींना अटक केली. घटनास्थळावरून ७० ड्रम रसायन, दोन टँकर, १०० रिकामे ड्रम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
उपायुक्त पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पिंपळविहीर येथील चिकूच्या धाब्यावर धाड टाकली. त्या ठिकाणी रसायनाचा उग्र वास आला. त्यामुळे पोलिसांनी धाब्यामागील परिसराची पाहणी केली असता, दोन टँकरमध्ये काळ्या रंगाचे रसायन आढळून आले. सात ड्रममध्ये अन्य एक रसायन होते, तर शंभर ड्रम रिकामे होते. पोलिसांनी तेथे उपस्थित सहा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या रसायनाचा वापर डांबरात भेसळ करण्यासाठी होत असल्याचे निदर्शनास आले. ते सर्व रसायन मानवी शरीरासाठी घातक असल्याचे निरिक्षण पोलीस उपायुक्तांनी नोंदविले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, हे रसायन मुंबईसह विदेशातून आयात केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. रसायनासंबंधी पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. मात्र, हा गुन्हा आपल्याशी संबंधित नसल्याचे एफडीएने स्पष्ट केले.
जप्त केलेले रसायन घातक
पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क केला. त्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात नांदगावपेठ पोलिसांनी आरोपींविरुध्द पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ८, १५, भादंविच्या कलम २८४, २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.
जप्तीतील रसायन ‘सायक्लोहेक्झेन’ नावाचे असून, त्या ड्रमवर इंटरनॅशनल सॉल्व्हंट अॅन्ड केमिकल कंपनी, मुंबई असे नमूद आहे. ‘बेन्झिल क्लोराइड’ नावाचे रसायन काही ड्रममध्ये आढळून आले. हे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असल्याचे चिन्ह सुध्दा ड्रमवर आहे. या रसायनामुळे डोळे निकामी होतात. त्वचेवर पडल्यास घातक जखमा होतात तसेच दुर्गंधीमुळे श्वासोच्छवासाचा विकार व कॅन्सरसारखा आजार होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या रसायनाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.
मुंबई, बेल्जियम येथून येते रसायन : पोलिसांनी रसायनाच्या ड्रमची तपासणी केली असता, त्यावर एका कंपनीचे स्टिकर होते. त्यावरुन काही रसायन मुंबई, तर काही युरोपातील बेल्जियम येथून आयात करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यात रसायन विक्री व्यवसायातील मो. सलीम सिद्दीकी, मो. नासीर व इरफान या तीन व्यक्तींची नावे पुढे आली आहे.
राज्यभरात भेसळयुक्त डांबराचा उपयोग? : भेसळयुक्त डांबराचा राज्यभरातील अनेक रस्त्यांमध्ये उपयोग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी जप्त केलेले रसायन कोट्यवधी रुपयांचे असल्याचा अंदाज आहे.
पुन्हा दोन पोलिसांचे आरोपींशी लागेबांधे
पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी रसायनाचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, चिकू धाब्याच्या मालकाने दोन पोलिसांच्या मोबाइलवर कॉल केला आणि धाड पडल्याचे सांगितले. त्यावरून संबधित दोन्ही पोलिसांनी ते रसायन नसून, डिस्टिल्ड वॉटर आहे असे उपायुक्त साहेबांना सांगा, असा सल्ला आरोपींना दिला. आरोपींशी लागेबांधे असणाऱ्या त्या दोन्ही पोलीस कर्मचाºयांची डीसीपीकडून कानउघाडणी करण्यात आली असून, त्याचा चौकशी अहवाल सीपींसमोर ठेवले जाणार आहे. त्यानंतर त्या दोन्ही पोलिसांवर कारवाई होईल.
नांदगावपेठलगतच्या चिकूच्या धाब्यावर केमिकलचा वापर करून मिक्सिंगचा प्रकार चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने तेथे धाड टाकून रसायनाचा मोठा साठा जप्त केला आहे. सहा आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. डांबरात भेसळ करण्यासाठी त्या रसायनाचा वापर होत असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
- चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त.