खुल्या भूखंडातील डबकी, डेंग्यूचे ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:13 AM2021-07-31T04:13:23+5:302021-07-31T04:13:23+5:30

अमरावती : या महिन्यात १० तारखेपासून सातत्याने पाऊस होत असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात दहा हजारांवर ...

Dumpy 'hotspots' | खुल्या भूखंडातील डबकी, डेंग्यूचे ‘हॉटस्पॉट’

खुल्या भूखंडातील डबकी, डेंग्यूचे ‘हॉटस्पॉट’

Next

अमरावती : या महिन्यात १० तारखेपासून सातत्याने पाऊस होत असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात दहा हजारांवर असलेल्या खुल्या भूखंडांत डबकी साचून हे डेंग्यूचे हॉटस्पॉट बनले आहेत. या महिन्यात जिल्ह्यात ८२ डेंग्यू पॉझिटिव्हची नोंद झालेली आहे. यामध्ये तब्बल २९ रुग्ण हे महापालिका क्षेत्रातील आहेत.

यंदाच्या जुलै महिन्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. ९ तारखेपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील आऊटस्कड भागात तसेच शहरात ठिकठिकाणी असलेल्या खुल्या भूखंडांमध्ये पावसाचे पाणी साचून मोठमोठी डबकी तयार झालेली आहेत. या ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढत असल्याने त्यांपासून होणाऱ्या आजारांमध्ये भर पडली आहे.

महापालिका व नगरपालिकांद्वारा याविषयी फारशी खबरदारी घेतली जात नाही. येथे पाणी काढण्यासाठी गटारी व अन्य उपाययोजना केल्या जात नसल्याने संततधार पावसाने शहरभर हीच स्थिती दिसून येते. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४५० वर डेंग्यूचे संशयित रुग्ण आहे. नमुने तपासणीची प्रयोगशाळा अकोला येथे असल्यामुळे दोन ते तीन आठवडे अहवाल मिळत नाही, ही या आजारानंतरची आणखी एक समस्या आहे.

केवळ डेंग्यूच नव्हे तर व्हायरल ताप, मलेरिया व चिकनगुणिया, आदी डासांपासून होणाऱ्या आजारांची रुग्णसंख्याही वाढतीच आहे. जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अमरावती शहर व ग्रामीणमध्ये अचलपूर तालुक्यात डेंग्यूचे रुग्णसंख्या वाढती आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळीच खबरदारी न घेतल्यास या आजारांचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे.

बॉक्स

घराघरांत व्हायरल तापाचे रुग्ण

सध्याच्या पावसाळी वातावरणात घराघरांत व्हायरल तापाचे रुग्ण; याशिवाय सर्दी-खोकल्याचे रुग्ण असल्याने सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. याशिवाय डेंग्यू, मलेरिया या रुग्णांची त्यात भरली आहे. सध्याचे वातावरण विषाणूंसाठी पोषक आहे व एकाकडून दुसऱ्या आजाराचे संक्रमण होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बॉक्स

किमान एमओएल ऑइल तरी टाका

अनेक भागांत खुल्या भूखंडांत पाणी काढून दिले जाते. याशिवाय या भूखंडांमध्ये झाडे-झुडपे वाढल्याने पाणी वाहून न जाता साचते. त्यामुळे या प्लॉटमध्ये गवत दिसत असले तरी त्याखाली पाण्याची डबकी असतात. हे डासांचे उगमस्थान असल्याने उत्पत्ती रोखण्यासाठी या डबक्यांमध्ये किमान एमओएल ऑइल तरी टाका, अशी नागरिकांची मागणी आहे.

कोट

जिल्ह्यात अमरावती शहर व अचलपूर तालुक्यांत डेंग्यूचे वाढते रुग्ण आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात सर्व्हे सुरू केलेला आहे. नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा, पाण्याची भांडी नियमित साफ करावीत व अंगभर कपडे घालणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. शरद जोगी

जिल्हा हिवताप अधिकारी

Web Title: Dumpy 'hotspots'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.