महिलांचा दुर्गावतार, दारू विक्रेत्याला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:24 PM2017-09-23T23:24:23+5:302017-09-23T23:24:40+5:30
मायानगर परिसरातील देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून महिलाशक्तीने या दुकानाला कुलूप ठोकले. शनिवारी दुपारी दोन तास चाललेल्या या ‘हाय व्होल्टेज’ आंदोलनात संत्रस्त महिला भगिनी व पुरुषांनी ....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मायानगर परिसरातील देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून महिलाशक्तीने या दुकानाला कुलूप ठोकले. शनिवारी दुपारी दोन तास चाललेल्या या ‘हाय व्होल्टेज’ आंदोलनात संत्रस्त महिला भगिनी व पुरुषांनी कमालीची एकी दाखवीत संबंधित दुकानदारालाही चोप दिला. प्रत्युत्तरात त्यानेही महिला नगरसेविकेला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
दुकान बंद केल्यानंतर मायानगर भागातील नागरिकांनी फटाके फोडून दारूमुक्तीचा आनंद साजरा केला. युवा स्वाभिमानच्या नगरसेविका तथा विधी समितीच्या सभापती सुमती ढोके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यात आले. दारूने भरलेल्या बाटल्या दुकानासमोर फोडून आगही लावण्यात आली. अनेक दिवसांपासून बंद असलेले मायानगर येथील देशी दारूचे दुकान शुक्रवारी पुन्हा उघडण्यात आले. त्यामुळे मद्यपींचा त्रास पुन्हा सुरू झाला. या दुकानामुळे या भागातील महिलांचे जीणे हराम केले होते. सोबतच एमआयडीसीमध्ये काम करण्यास जाणाºया महिला व महाविद्यालयीन तरुणींना मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हे देशी दारुचे दुकान हटवावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती.
शेकडो महिलांचा सहभाग
दरम्यान शुक्रवारी हे दारू दुकान पूर्ववत सुरू झाल्याची माहिती नगरसेविका सुमती ढोके यांना मिळाली.त्यानुसार शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास त्या सहकारी महिला पुरुषांसह दारू दुकानावर धडकल्या. संचालकाला दुकान बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.मात्र प्रदीप गुजर या दारू दुकानमालकाने प्रत्युत्तरात दुकान बंद करण्यास साफ नकार दिल्याने महिलाशक्ती खवळली. यावेळी चांगलीच हमरीतुमरी झाली. दरम्यान दुकान मालकाला धक्काबुक्की व मारहाण करून बाहेर काढल्यानंतर संतप्त महिला, पुरुषांनी दारूचे बॉक्स व अन्य साहित्य बाहेर आणून त्याला आग लावली. त्यामुळे तणावात अधिक भर पडली. दुकान बंद करताना या देशी दारू दुकानाचा मालक प्रदीप गुजर नगरसेविका सुमती ढोके यांच्या अंगावर धावून गेला. त्यांना सळाखीने मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही तरुणांनी ढोके यांचा बचाव केला. जाळपोळ व हमरीतुमरी झाल्यानंतर या दुकानाला कुलूप लावण्यात आले. दुकान पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
फटाके फोडून दारुमुक्तीचा जल्लोष
या दारू दुकानांमुळे महिला, तरुणी संत्रस्त होत्याच. मात्र, या भागातील मुला-मुलींचा विवाह संबंधातही हे दुकान अडसर ठरले होते. वैयक्तिक भांडणातही भर पडली होती. त्यामुळे हे दुकान बंद करण्याची या भागातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यानुसार शनिवारी या दुकानाला कुलूप ठोकण्यात आल्याची प्रतिक्रिया या आंदोलनाचे नेतृत्व करणाºया सुमती ढोके यांनी दिली. ढोके व त्यांच्या सहकाºयांसह मायानगरातील नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष केला.
गुजरच्या तक्रारीवरुन ढोकेंविरुद्ध गुन्हा
मायानगर येथील देशी दारू दुकानाचा मालक प्रदीप गुजर याचे तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी नगरसेविका सुमती ढोके यांच्यासह अन्य २० ते २५ महिला पुरुषांविरुध्द गुन्हा दाखल केला. ढोेके व अन्य जणांनी आपल्याला धक्काबुक्की केली. जिल्हाधिकाºयांची परवानगी असताना बळजबरीने दुकान बंद करण्यात आल्याची तक्रार त्याने नोंदविली. तक्रारीवरुन ढोके व अन्य जणांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, ४३५, ४२७, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राजापेठच्या ठाणेदारांनी दिली.